Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Time to give canal water to kharif crops during monsoon

भर पावसाळ्यात कालव्याचे पाणी खरिपाच्या पिकांना देण्याची वेळ

प्रतिनिधी | Update - Aug 02, 2018, 12:10 PM IST

पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. आठ दिवस पाऊस झाला नाही, तर पिके जळून जाण्याचा धोका आहे.

 • Time to give canal water to kharif crops during monsoon

  राहुरी- पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. आठ दिवस पाऊस झाला नाही, तर पिके जळून जाण्याचा धोका आहे. भर पावसाळ्यात पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडावे लागण्याची वेळ आली आहे.


  जिल्ह्यात यंदा ४ लाख २४ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा ५ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज होता. पण ९० टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. दरवर्षी दीड लाख हेक्टरवर कपाशीचे पीक घेतले जाते. बोंडअळी व अपुरा पाऊस यामुळे कपाशीचे क्षेत्र ५० हजार हेक्टरने घटले असून सुमारे १ लाख हेक्टरवरच लागवड झाली आहे. बागायती भागात लाल कांद्याखालील क्षेत्र वाढले आहे. पाथर्डी व शेवगाव भाग हा कपाशीचे आगार असलेला भाग आहे. पण तेथे यंदा कपाशीखालील क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यात तूर, सोयाबीन, मूग यांचे क्षेत्र वाढले आहे. खरिपातील लाल कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. सुमारे तीनपट ही लागवड आहे. दरवर्षी तुरीखालील ७ हजार ८७४ हेक्टर क्षेत्र असते. यंदा त्यात वाढ होऊन २६ हजार २७५ हेक्टरवर गेले आहे. मुगाचे क्षेत्र १९ हजार हेक्टरवरून ३३ हजार हेक्टरवर, तर उडिदाचे क्षेत्र १० हजारवरून २७ हजार हेक्टरवर गेले आहे.


  नगर व पारनेर भागात वाटाण्याचे पीक घेतले जाते. यंदा २ हजार २५७ हेक्टर क्षेत्रात वाटाणा पीक घेण्यात आले आहे. सोयाबीन व मका पिकाकडेही कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, संगमनेर, राहाता या भागातील नदीकाठचा शेतकरी वळला आहे.


  १ ते ५ जूनच्या दरम्यान जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. त्यानंतर तब्बल २० दिवस पावसाने उघडीप दिली. २१ ते २५ जूनच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला. १९ ते २२ जुलैदरम्यान जिल्ह्याच्या बहुतेक भागात झालेल्या पावसामुळे ९० टक्के पेरण्या झाल्या. दरवर्षीपेक्षा यंदा ८ टक्के पाऊस कमी होता. यंदा अकोेले, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे या भागात चांगला पाऊस झाला होता. नेहमीप्रमाणे सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात झाला. तुलनेने राहुरी, नेवासे, नगर, कर्जत, पाथर्डी या भागात पाऊस कमी आहे. त्यामुळे तेथे अजूनही पेरणी झालेली नाही. उगवलेली पिके पावसाने ताण दिल्याने जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.


  कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले असून त्याचा फायदा श्रीगोंदे, पारनेर, कर्जत भागातील खरिपाच्या पिकांना होणार आहे. सुमारे साडेतीन टीएमसी पाणी चालू आवर्तनात वापरले जाणार आहे. मुळा धरणात साडेपंधरा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. खरीप पिकांकरिता धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले. मुळा धरणाखालील उसाचे २० हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तसेच १० हजार हेक्टर खरिपाच्या क्षेत्राची त्यात वाढ होणार आहे. भर पावसाळ्यात पाणी सोडण्याची वेळ आली आहे. साडेतीन ते चार टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणातील साठा सहा टीएमसीपेक्षा जास्त झाला आहे. धरण सुरक्षेकरिता सहा टीएमसीपेक्षा जास्त झालेले पाणी नदीपात्रात सोडावे लागणार आहे.


  पिकांवर रोग
  आठ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. काही भागात उघडीप देऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. पावसाअभावी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यात ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषतः सोयाबीन, कपाशी व भाजीपाल्याच्या पिकांवर रोग पडला आहे. विचित्र हवामानामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे.

Trending