आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक व आरामबसची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्ग ६१ वर पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथे मालट्रक व खासगी आरामबसचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास झाली.

 

पुण्याहून परभणीकडे जाणारी खासगी आरामबस (ए आर २० - १४९०) व बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून सरकी पेंड घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक (एम एच १२ ई क्यू ८८७९) समोरासमोर जोरदार धडक झाली. यात आयशरचा चालक परमेश्वर लोखंडे (२४) व बसचालक सोपान ढाकणे (३२) या दोघांचा मृत्यू झाला. ढाकणे हा परभणीचा, तर लोखंडे हा बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील रुई येथील रहिवासी आहे.

 

बसमधील सात-आठ प्रवाशांना दुखापत झाली. जखमी झालेल्या प्रवाशांची नावे : सुरेश रणखांबे (वय ३५, औंढा नागनाथ, हिंगोली), श्रावणी भोसले (वय ७, माजलगाव , बीड), मीना कदम (वय ३५, मानवत, परभणी), विलास शिंदे (वय ३५, माजलगाव, बीड).
पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ सुपारे, पोलिस नाईक वाल्मिकी पारधी, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब तांबे, कॉन्स्टेबल भगवान सानप आदींना स्थानिक रहिवाशांनी मदत केली.

 

स्थानिकांच्या माहितीनुसार आरामबसचा चालक ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या आयशर ट्रॅकवर जाऊन धडकला. धडक एवढी जोराची होती की, दोन्ही वाहनांच्या पुढचा भागाचा चक्काचूर झाला. सकाळी जेसीबीच्या साह्याने एकमेकात गुंतलेल्या गाड्या ओढून वेगळ्या केल्यानंतर मृतदेह पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यावेळी पोलिस हवालदार अरविंद चव्हाण, कॉन्स्टेबल नय्युम पठाण, संजय आव्हाड, राजेंद्र डोळस आदी पोलिस कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक अरुण कोलते, जिलनी शेख, अनिल वायकर, फिरोज शेख,महंमद शेख मदतीसाठी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांचे एक पथक कारंजी येथे कार्यरत आहे, पण तेथे एकही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हता. त्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...