आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभारी तहसीलदार, तलाठ्यास वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न, दोघांवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- वाळूतस्कराकडून प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ व कर्मचारी यांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला. त्यात ते बालंबाल बचावले. घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना मिरी रोडवरील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जिमखाना गेटसमोर घडली. याप्रकरणी दोघांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महसूल व तलाठी संघटनेने आरोपीला अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले. 


शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यासह तलाठी कमलाकर आरडले, तुकाराम बुळे, बाळासाहेब केदार कर्मचारी दत्तात्रय पालवे हे पथक आपल्या एमएच १६ एएस ३०४७ व एमएच १६ एझेड ७२६० या दोन मोटारसायकलींवरून शुक्रवारी पहाटे सहा वाजता अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी वडुले येथून शेवगावकडे येत असताना त्यांना शहरात न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज जिमखाना गेटसमोर समोरून वाळूने भरलेला डंपर भरधाव वेगात येताना दिसला. त्यास अडवून त्यावर कारवाई करण्यासाठी या पथकाने मोटारसायकली रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या आणि त्यास थांबण्याचा इशारा केला. मात्र, डंपरच्या वाहनचालकाने प्रभारी तहसीलदार गुंजाळ यांच्यासह पथकातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मोटारसायकलींना धडक दिली. मात्र, प्रसंगावधान बाळगून हे कर्मचारी रस्त्याच्या बाजूला पळाल्याने ते बचावले. 


हा डंपर भरधाव वेगाने निघून गेला. डंपरचा नंबर पाहता आला नसला, तरी तो कोणाचा आहे याची माहिती सांगितल्याने शेवगाव पोलिसांनी नागेश गोविंद निकाळजे (इंदिरानगर, शेवगाव) व एक अनोळखी अशा दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपी निषेधार्थ व आरोपीला अटक होईपर्यंत महसूल व तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. 
दरम्यान, यापूर्वीही अशा काही घटना तालुक्यात झालेल्या आहेत. परंतु जिल्ह्यासह येथील काही पोलिस अधिकारी या अवैध वाळू व्यवसायास पाठबळ देण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाळूतस्करांचा मुजोरपणा वाढलेला आहे. त्यामुळे महसूलच्या कर्मचाऱ्यांना वाहनाखाली चिरडण्याचे धाडस त्यांच्यात वाढले आहे. 

 

आरोपीच्या शोधासाठी पथक नियुक्त 
अवैध वाळू व्यवसाय मोडीत काढण्यासाठी आता मुळावर घाव घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी एकत्रित पथक तयार करून कारवाई केली जाईल. आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथक नियुक्त केले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून जामीन मिळणार नाही, यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी महसूल संघटनेला दिले. 


पोलिस अधिकाऱ्यांच्या दालनात वाळूतस्कर! 
प्रभारी तहसीलदार गुंजाळ व तलाठी यांना चिरडण्याचा प्रयत्न झाला असला, तरी वाळूतस्करांची पोलिस ठाण्याच्या आवारात टेहळणी सुरू होती, तर काही वाळूतस्कर पोलिस अधिकाऱ्यांच्या दालनात बसलेले होते. 

बातम्या आणखी आहेत...