आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या सतर्कतेमुळे स्वस्त सोन्याचा 'ड्रॉप' फसला; २ महिला जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- घायपतवाडीजवळ काटवनात दोन महिला संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून १ किलो बनावट सोन्यासह या दोघींना जेरबंद करण्यात आले. 


शहरापासून ३ किलोमीटरवर आढळगाव रस्त्यावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, काटवनात काही महिला संशयास्पद हलचाली करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या महिलांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून सारिका नितीन चव्हाण (वय २२), वैशाली रामदास चव्हाण (वय २१, दोघी राहणार गुंडेगाव, ता. नगर) यांना पकडले. महिला कॉन्स्टेबल अविंदा जाधव यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ बाजाराच्या पिशवीत एक किलो वजनाच्या पिवळ्या रंगाच्या बनावट अंगठ्या मिळाल्या. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मुंबई येथील काही लोकांना ५ लाखांत १ किलो सोने देतो, असे सांगून आम्ही बोलावले आहे. या बनावट अंगठ्या त्यांना देऊन आम्ही त्यांच्याकडून ५ लाख रुपये घेणार होतो. 


पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भादंवि ३९४, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव करत आहेत. 


ही कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव, कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, अविनाश ढेरे, दादा टाके, उत्तम राऊत, अमोल शिंदे, महिला कॉन्स्टेबल अविंदा जाधव आदींचा समावेश होता.

 
आमिष दाखवून लूट 
स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून लुटण्याचे अनेक प्रकार याआधीही श्रीगोंदे तालुक्यात झाले आहेत. एवढ्या स्वस्तात सोने मिळणे शक्य नाही, हे माहिती असूनही मोठ्या शहरातील अनेकजण त्याला बळी पडतात. काहीजण या लुटीची तक्रारही पोलिसांत न देता तोंड लपवून निघून जातात. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे पोलिसांना अवघड जाते. अशा प्रकारे लुबाडणूक व मारहाण करणाऱ्या अनेक टोळ्या श्रीगोंद्यात अाहेत. पोलिसांनी त्यांची पाळेमुळे उखडल्यास हे प्रकार थांबतील. 

बातम्या आणखी आहेत...