आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांची बालिका ट्रॅक्टरखाली ठार; वडिल व काकाला जबर धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- घराजवळील ओट्यावर लहान भावाबरोबर खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील बोटा येथे घडली. आरोही प्रवीण थोरात असे या चिमुकलीचे नाव आहे. चिमुकलीचा अपघाती मृत्यू पित्याच्या व काकाच्या हातून झाल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. 


मंगळवारी सकाळी बोटा येथील प्रवीण आणि अरविंद सखाराम थोरात हे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरला फण जोडण्याचे काम घरासमोरील अंगणात करत होते. याचदरम्यान लहान भावाबरोबर खेळणारी आरोही नकळत ट्रॅक्टरजवळ आली. ट्रॅक्टर सुरु केल्यानंतर मागे-पुढे घेत असताना नेमकी आरोही ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. वडील आणि चुलत्यांनी तातडीने तिला बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणीही उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मरण पावल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, पोलिस पाटील शिवाजी शेळके, घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निघोट यांनी घटनास्थळी भेट दिली. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.