आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इर्विन एआरटी केंद्रावर \'एचआयव्ही बाधितांसाठी टोकन पद्धतीचा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- 'एचआयव्ही बाधितांची'ओळख जाहीर होऊ नये म्हणून त्यांच्यावर उपचार करताना, इतर ठिकाणी खबरदारी घेण्यात येते. मात्र हे रुग्ण जेव्हा औषधांसाठी किंवा समुपदेशनासाठी एआरटी केंद्रावर येतात तेव्हा त्यांना नाव पुकारून बोलावले जात होती. यामुळे अशा रुग्णांना संकोच वाटे. अशा रुग्णांची अडचण दूर करण्यासाठी इर्विन रुग्णालयातील एआरटी केंद्रावर 'एचआयव्ही' बाधिताला नावाने न बोलावता टोकन क्रमांक दिला जात आहे. स्क्रीनवर टोकन नंबर येताच रुग्ण कक्षात जाऊन औषधे घेत असल्याने या रुग्णांची अडचण दूर झाली. 


या केंद्रावर दर महिन्याला ३ हजारांच्या जवळपास रुग्ण औषधोपचार घेतात. प्रत्येक रुग्णाला एआरटी केंद्रावर व्हाइट कार्ड देण्यात आले आहे. तसेच एआरटी केंद्रावर त्याच व्यक्तीचे ग्रीन बूक आहे. यात रुग्णाला दिलेल्या औषधी आणि त्याने नंतर कोणत्या तारखेला यायचे अशा नोंदी आहेत. या पद्धतीमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही सोय झाली आहे. 


टोकन पद्धती सुरू होण्यापूर्वी सदर बाधित व्यक्ती एआरटी केंद्रावर आल्यानंतर त्या व्यक्तीने व्हाइट कार्ड केंद्रावर द्यायचे, त्यानंतर प्रतीक्षालयात बसल्यानंतर त्याचा नंबर आला कि, कर्मचारी नाव घेऊन त्याला बोलावायचे, यामुळे उपस्थित रुग्ण व लोकांनाही ते ऐकायला जायचे व एचआयव्ही बाधित व्यक्ती कोण, हे दिसायचे. मात्र टोकन पद्धती सुरू झाल्यानंतर त्या व्यक्तीने केंद्रावर आल्याबरोबर व्हाइट कार्ड संबधित कर्मचाऱ्याला द्यायचे. त्यानंतर त्याचवेळी रुग्णाला टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर संबधित व्यक्ती टोकन घेऊन प्रतीक्षालयात बसतो. ज्यावेळी त्याचा क्रमांक येईल, त्यावेळी स्क्रीनवर त्याचा टोकन क्रमांक झळकतो. त्या नंतर रुग्णाने औषधासाठी कक्षात जावे, या वेळी टोकन दिल्यानंतर त्याला औषध दिली जाते. हा प्रयोग चार महिन्यांपासून इर्विनच्या एआरटी केंद्रावर सुरू झाला आहे. यामुळे रुग्णांची ओळख जाहीर होत नाही. गर्दी असल्यामुळे रुग्णांना प्रतिक्षा करावी लागते. या वेळी केंद्रावर दोन टिव्ही लावले आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. निकम, एआरटी केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. विलास जाधव, केंद्राच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोगा देशपांडे यांच्यासह कर्मचारी, अधिकाऱ्यांचे सहकार्य प्राप्त झालेले आहे. 


ओळख जाहीर होऊ नये हाच उद्देश
एआरटी केंद्रावर औषध घेण्यासाठी किंवा समुपदेशनासाठी येणाऱ्या रुग्णाची ओळख जाहीर होऊ नये म्हणून आमच्या रुग्णालयातील एआरटी केंद्रावर आम्ही टोकन पद्धती सुरू केली आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सकडॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली. 


१ ते २० क्रमांकाचे टाेकन ठेवले राखीव 
दररोज एआरटी केंद्रावर शंभरावर रुग्ण येतात. अशा वेळी एचआयव्ही बाधित गर्भवती महिला, क्षयरोग बाधित रुग्ण आल्यास त्यांना औषध मिळावी म्हणून टोकन क्रं. एक ते वीस या दरम्यानचा क्रं. देण्यात येतो. गर्भवती स्त्रीला थांबावे लागू नये क्षयरोगग्रस्त एचआयव्ही बाधितामुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनाही औषध दिली जाते. यासह पहिल्यांदा आलेल्या रुग्णालाही एक ते वीस क्रं.चे टोकन दिले जाते,असे एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले. 


राज्यातील पहिला प्रयोग यशस्वीपणे सुरू 
औषधोपचारासाठी येणाऱ्या एचआयव्ही बाधिताची ओळख जाहीर होवू नये म्हणून आम्ही एआरटी केंद्रावर टोकन पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. टोकन पद्धतीचा वापर होणारे हे राज्यातील पहिले केंद्र आहे. हा पायलट प्रोजेक्ट आमच्याकडे यशस्वीपणे सुरू आहे. विशेष म्हणजे टोकन पध्दतीसाठी आवश्यक असलेले बहुतांश उपकरण लोकसहभागातून आम्हाला प्राप्त झाले आहे. 
- अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी. एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्ष. 

 

बातम्या आणखी आहेत...