आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोगेश्वरी आखाडा बायपासमधून येवले आखाडा परिसराला पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- येवले आखाडा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जोगेश्वरी आखाडा पाणी योजनेतून बायपास करण्यात आल्याने काही भागात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोनाली प्राजक्त तनपुरे यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे पाणी पुरवठा विभागप्रमुखांचे लक्ष वेधले होते. 


गेल्या अनेक महिन्यांपासून येवले आखाडा प्रभागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. २००० मध्ये या भागात जलवाहिनीचे काम झाले होते. मात्र, ते निकृष्ट झाल्याने पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्यावर मर्यादा आल्या होत्या. योजनेचा वाड्या-वस्त्यांवर हवा तेवढा विस्तार झाला नसल्याने नळ कनेक्शनची संख्या अपुरी आहे. या भागात गढूळ, तसेच कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. काही भागात पाणी मिळत नसल्याने ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या राहुरी शहरातून पाणी आणण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते. 


पाणी पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी नगरसेवक शहाजी जाधव व संगीता जाधव यांच्या नेतृत्वाखाली येवले आखाडा येथील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाच्या गलथान कारभाराचा भांडाफोड केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांच्या कारकीर्दीत महिनाभराचा कालावधी उलटूनही या मागणीची दखल घेण्यात आली नव्हती. 


आठवडाभरापूर्वी नगरसेवक जाधव यांनी नव्याने हजर झालेले मुख्याधिकारी अनुप दुरे यांना येवले आखाडा येथील पाणीप्रश्नासंबंधी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. मुख्याधिकारी दुरे यांनी येवले आखाडा येथील पाणी पुरवठ्यात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. सोनाली प्राजक्त तनपुरे यांनीही पाणीप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. पाणी पुरवठा विभागप्रमुख काकासाहेब अढागळे, तसेच सुनील कुमावत व अन्य कर्मचाऱ्यांनी येवले आखाडा येथे स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी जोगेश्वरी बायपास योजनेतून काम मार्गी लावले. येवले आखाडा प्रभागातील वामनवस्ती, कदमवस्ती, सप्तश्रृंगी मंदिर, काॅलेज रोड या परिसरातील गंभीर बनलेला पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मात्र, प्रभागात पाणी योजनेचा विस्तार नसल्याने हारदे वस्ती, पाटबंधारे कार्यालय परिसर, अमरधाम, गोंधवाडी, वाघवाले वस्ती येथील पाण्याची गंभीर समस्या कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...