आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेत शिवसेनेबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही -खासदार दिलीप गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवसेनेकडे विकासाचा कुठलाही अजेंडा नाही. केवळ प्रसिद्धी मिळते म्हणून ते भाजपवर टीका करतात. नगरसेवक असलेल्या ठेकेदारांचीच संख्या महापालिकेत जास्त झाली आहे. किती घाणेरडे राजकारण सुरू आहे? काय चाललंय काय नगरमध्ये? असा सवाल खासदार दिलीप गांधी यांनी करून महापालिकेत कधीच शिवसेनेबरोबर आम्ही युती करणार नाही, असे त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. 


खासदार गांधी यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, भाजपच्या आेबीसी आघाडीचे शहराध्यक्ष सागर गोरे यावेळी उपस्थित होते. खासदार गांधी म्हणाले, केडगाव प्रकरणानंतर उद्धव ठाकरे नगरमध्ये आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. त्या सर्व आरोपांचे मी खंडन करतो. महाराष्ट्राने सर्वांगीण प्रगती साधली आहे. ज्या नगर जिल्ह्यात कधीकाळी ९५० पाण्याचे टँकर सुरू होते, तेथे केवळ १२ टँकरला मान्यता देण्यात अाली आहे. क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा नगर जिल्हा आहे. गोवा, त्रिपुरा राज्य जेवढे आहे, तेवढाच आपला मतदारसंघ आहे. 

नगरला स्वातंत्र्य लढ्याची परंपरा लाभली आहे. अनेक दिग्गज नेते या जिल्ह्याने दिले आहेत. मात्र, काही लोक या जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. नगर जिल्ह्यात ज्या दोन-तीन घटना घडल्या असतील, त्या व्यक्तिगत होत्या. या घटनांचे मोठे भांडवल करून जिल्ह्याला बदनाम केले गेले. महाराष्ट्रातील उत्तम जिल्हा नगर आहे. कुठल्याच नेत्याने कधीच गुंडगिरी व दहशतीला मदत केली नाही. जिल्ह्यात कुणी गुंठा मंत्रीही झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. केडगाव प्रकरणानंतर पोलिस प्रशासन आपल्या पद्धतीने काम करत आहेत. कायद्यासमोर सर्व समान आहेत. सरकार कुठल्याही दबावाखाली काम करत नाही. नगर शहर विकासापासून वंचित रहात आहे. २०१२ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून पाणी योजना मंजूर करून आणली. २०१८ वर्ष उजाडले, तरी योजना पूर्ण झाली नाही. त्यात दोष कुणाचा? किती घाणेरडे राजकारण आहे हे? गटारीच्या कामातच पदाधिकारी गुंतलेले आहेत. गटारी करणे हाच त्यांना विकास वाटतो. महापालिकेत सध्या सत्ता त्यांची आहे. विकासकामे होत नसल्यामुळेच आम्ही सत्तेपासून दूर गेलो. भविष्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांच्याबरोबर युती झाली, तरी महापालिकेत मात्र, आम्ही युती करणार नाही, असे गांधी यांनी सांगितले. 


केडगाव प्रकरण राजकीय वैमनस्यातून 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केडगावची घटना वैयक्तिक वादातून झाल्याचे सांगितले होते. त्यावर खासदार दिलीप गांधी यांना विचारले असता ते म्हणाले, केडगावमध्ये जी पोटनिवडणूक झाली त्यात शिवसेना व काँग्रेसच होती. त्यामुळे दुहेरी हत्याकांडाची घटना राजकीय वैमनस्यातून घडली आहे. या घटनेत भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही, असे त्यांनी सांगितले. 


उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार 
खासदार गांधी म्हणाले, केडगाव येथील घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. याबाबत ठाकरे यांना पत्र लिहून वस्तुस्थितीची माहिती अवगत करणार आहे. त्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. केडगाव घटनेचा अहवाल भाजपने तयार करून तो प्रदेश स्तरावर पाठवला. ठाकरे यांच्या सरकार निक्कमे असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, निक्कमे सरकार असेल, तर बाहेर पडा, असा टोला त्यांनी लगावला. 

बातम्या आणखी आहेत...