आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता काबीज करून प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत; प्रकाश आंबेडकर यांची अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सत्ताधारी होऊन आपणच आपले प्रश्न सोडवले पाहिजेत, अशी अपेक्षा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. माउली मंगल कार्यालयात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या संवादयात्रेत आंबेडकर बोलत होते. माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार अॅड. विजयराव मोरे, माजी आमदार हरिभाऊ भदे, प्रा. किसन चव्हाण, अॅड. डॉ. अरुण जाधव यावेळी उपस्थित होते. आंबेडकर पुढे म्हणाले, सत्ताधारी बनणार आणि संविधान वाचवणार अशी घोषणा देत संविधान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तो व्यवस्थेचा भाग झाला पाहिजे. धनगर, माळी, भटके विमुक्तांमधील २५ जाती, आदिवासी, भिल्ल व मुस्लिम समाज स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही सत्तेपासून वंचित आहेत. या सर्व वंचित घटकांनी एकत्र येऊन सत्ता काबीज केली पाहिजे व आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत. 


गेली ७० वर्षे आपण सत्ताधाऱ्यांकडे आपले प्रश्न सोडवण्याची मागणी केली, मात्र सत्ताधाऱ्यांना पाझर फुटला नाही. त्यामुळे ही भूमिका घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यासाठी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन वर्गातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी समस्त बहुजन समाजाची आहे. उमेदवारांच्या जातींची लोकसंख्या विचारात न घेता परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. 


धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील ५ जणांची हत्या केवळ भटक्या समाजाला हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन, गाव, जमीन नसल्यामुळे झाली. त्यांच्या कुटंुबीयांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. इथल्या सत्ताधारी पक्षावरचा आमचा विश्वास उडाला आहे, असे आंबेडकर म्हणाले. 


वंचित बहुजन आघाडीचा रस्ता खडतर आहे. भांडणे लावण्याचा प्रयत्न होईल. त्याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. वंचित असलेल्या समुहाला कसा न्याय देता येईल, हा जाहीरनाम्याचा प्रमुख उद्देश आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी प्रा. चव्हाण, अॅड. डॉ. जाधव, अशोक सोनवणे, अरविंद सोनटक्के, अनंत लोखंडे, अर्शद शेख, नारायण गडई, शिवाजी गांगुर्डे, सुधाकर आव्हाड, काशिनाथ चौघुले, मौलाना नदवी, मीरा शिंदे, प्राचार्य बाबुराव शिंदे, भीमराव चव्हाण, रामराव चव्हाण, प्रकाश भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. 


संभाजी भिडे यांना सत्ताधाऱ्यांचे अभय 
संभाजी भिडे गुरुजींनी पंढरपूर येथे केलेल्या वादग्रस्त विधानाचा आंबेडकर यांनी तीव्र शब्दांत निषेध करून टीका केली. संभाजी भिडे गुरुजींना सत्ताधाऱ्यांचे अभय असल्याशिवाय ते असे बेताल वक्तव्य करणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा विरोधात कुठलीही कारवाई करणार नाहीत. सर्व वारकऱ्यांनी भिडे गुरुजींच्या वक्तव्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी यावेळी केले. 

बातम्या आणखी आहेत...