आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीविरुद्ध युवक काढणार संसदेवर मोर्चा, बेरोजगार व विद्यार्थी जागृतीची मोहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-लोकसभा निवडणुकीत 'अच्छे दिन' व दर वर्षी एक कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन भाजपतर्फे देण्यात आले होते. साडेतीन वर्षे सत्तेत असूनही बेरोजगारीचा प्रश्न सुटत नसल्याने नौजवान भारत सभा, क्रांतिकारी मजदूर मोर्चा व दिशा विद्यार्थी संघटनेने भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यासाठी चलो दिल्लीचे आवाहन करत बेरोजगार व विद्यार्थी जागृतीची मोहीम देशभर सुरू करण्यात आली. 

 

या मोहिमेत सोमनाथ केंजळे, प्रवीण सोनवणे, अविनाश साठे, आशिष शिंदे, अतुल महारनोर, कुमार भिंगारे, संदीप सकट आदी सहभागी आहेत. रोजगाराचा मूलभूत अधिकार, वर्षभर रोजगार हमी, दहा हजार रुपये निर्वाह भत्ता, ठेकेदारी प्रथा बंद करा या मागण्यांसाठी दिल्लीतील भारतीय संसदेवर २५ मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सध्या नगर शहरात नौजवान भारत सभा, क्रांतिकारी मजदूर मोर्चा व दिशा विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. यात माहितीपत्रक वाटप, जनजागृतीपर व्याख्याने, पथनाट्ये आदी प्रकारे ही जनजागृती मोहीम राबवल्या जात आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील युवक दोन दिवस अगोदर रेल्वेने दिल्लीच्या दिशेने जाणार आहेत. 

कायद्यात रोजगाराचा मूलभूत अधिकारात समावेश करणे, प्रत्येक नागरिकाला वर्षभर रोजगाराची हमी मिळावी, बेरोजगारांना दहा हजार रुपये निर्वाह भत्ता मिळावा, ठेकेदारी प्रथा बंद करावी यासाठी केंद्र शासनावर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. या मोहिमेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागले आहेत. याबाबत जिल्हा समन्वयक सोमनाथ केंजळ म्हणाले, शहरातील बहुतांश महाविद्यालयांत, स्पर्धा परीक्षा केंद्रे व शहरातील वस्त्यांमध्ये आम्ही बेरोजगारीच्या मुद्द्यावर जनजागृती करून रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यासाठी लोकांना समर्थन करण्याचे आवाहन करत आहोत. यासाठी स्वाक्षरी मोहीमही सुरू आहे. या अभियानाचे रुपांतर २५ मार्चला रामलिला मैदान ते संसद भवन येथील मोर्चात होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...