आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: लग्नात डीजे वाजल्यास मंगल कार्यालयावर गुन्हा, पुण्‍याच्‍या धर्तीवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील वाहतुकीला वारंवार अडथळा ठरणाऱ्या मंगल कार्यालयांच्या विरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दंड थोपटले आहेत. ज्या मंगल कार्यालयातून डीजेच्या तालावर वरात निघेल, त्या मंगल कार्यालयाच्या मालकावरच आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

 

पुणे शहराच्या धर्तीवर नगरमध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे. लग्नसराईत नगरकरांना वाहतुक कोंडीच्या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. डीजे लावून रस्ता अडवणाऱ्या व त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मंगल कार्यालयाच्या विरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखा कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश मोरे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना शनिवारी दिली.

 

वाहतूक कोंडी ही नगरकरांची कायमची डोकेदुखी झालेली आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन व रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षकपदाचा नुकताच पदभार घेतलेल्या अविनाश मोरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही प्रमाणात का होईना, परंतु वाहतुक कोंडीची समस्या कमी झाली पाहिजे. त्यासाठीच लग्नसराईमध्ये रस्ते अडवणारे डीजे व त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या मंगल कार्यालय मालकांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय मोरे यांनी घेतला आहे. पुणे शहरात अशा प्रकारे कारवाई करण्यात येत असून त्यात तेथील वाहतूक पोलिसांना यश मिळालेले आहे. नगरमध्ये देखील मंगल कार्यालयांच्या विरोधात पुण्याच्या धर्तीवर कारवाई करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष करवाईला सुरुवात होणार आहे. पार्किंग हा देखील सध्याचा कळीचा मुद्दा आहे. महापालिकेने शहरात पार्कींगसाठी २५ जागा सुचवल्या आहेत. त्यापैकी ७ जागांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.

 

उर्वरीत जागांबाबतही लवकरच निर्णय होईल. महापालिकेने या जागा लवकरात लवकर पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. झेब्रा क्रॉसिंग, दुभाजक, सिग्नल आदींसाठी देखील संबंधित विभागांशी चर्चा करण्यात आलेली आहे. हे सर्व प्रश्न मार्गी लावून शहर वाहतुक सुरळीत ठेवण्याचा शहर वाहतूक शाखेचा प्रयत्न सुरू असल्याचे मोरे यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...