आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियामुळे भाजप सरकार सत्तेत बसले, दिलीप वळसे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशात व राज्यात केव्हाही मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता आपसांतील मतभेद विसरून निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे. केंद्र व राज्यातील सरकार सोशल मीडियामुळेच सत्तेत बसले आहे, ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक दिलीप वळसे यांनी केले.


जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजन बैठकीत वळसे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नेते दादा कळमकर, पांडूरंग अभंग, विठ्ठल लंघे, अॅड. प्रताप ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, शहर महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले, अशोक बाबर, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, कपिल पवार, सोमनाथ धूत, राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे हे हल्लाबोल आंदोलन १५ व १६ फेब्रुवारीला निघणार आहे. श्रीगोंदे, शेवगाव व राहुरी येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सभा होणार आहे.

 

वळसे म्हणाले, राष्ट्रवादीला नगरमध्ये चांगले वातावरण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून कामाला लागले पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचले पाहिजे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विरोधक पक्षातील गटातटाचा फायदा घेत आहेत. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते अजूनही सत्तेत असल्यासारखे वागत आहेत. हल्लाबोल अांदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. मराठवाड्यात या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे, गुजरातमधील शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात मतदान केले. केंद्रात व राज्यात सरकार विरोधी वातावरण निर्माण झाले असल्याचे वळसे यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीसाठी शहर व जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

तीन ठिकाणी होणार हल्लाबोल सभा
श्रीगोंदे येथून हल्लाबोल आंदोलनास सुरूवात होणार आहे. यावेळी सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एक हजार मोटारसायकलींची रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता अजित पवार यांची सभा होणार आहे. यावेळी सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे उपस्थित राहणार आहेत. श्रीगोंदे येथील सभेनंतर शेवगाव येथे दुपारी ३ वाजता, तर राहुरी येथे सायंकाळी साडेसात वाजता सभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी १६ फेब्रुवारीला अकोले येथे सकाळी १० वाजता सभा होणार आहे.

 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेत मालाला हमीभाव द्यावा, बीटी कपाशीचे बियाणे ३० एप्रिलपर्यंत उपलब्ध करून द्यावे, कापसाला प्रतिक्विंटल ५०० रुपयांचे अनुदान द्यावे, गाईच्या दुधाला ३०, तर म्हशीला ५० रुपयांचा दर द्यावा, कापूस, तूर, सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करावीत, सरकाने खोट्या व फसव्या जाहिरातील बंद करून जनतेच्या पैशांची बचत करावी, भारनियमन बंद करावे, पेट्रोल व डिझेलची जीएसटी प्रमाणे विक्री करावी, आदी मागण्या हल्लाबोल आंदोलनात करण्यात येणार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...