आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: अहमदनगरचे असे हे गांधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संसदेत सध्या असलेल्या इनमिन सहा गांधींपैकी एक असलेले दिलीपकुमार गांधी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर येथील खासदार. मधल्या काळात साधारण १३ महिन्यांसाठी ते केंद्रात जहाजबांधणी खात्याचे राज्यमंत्रीही होते. तीन वेळा ते अहमदनगरमधून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. सध्या एकामागोमाग एक अशा काही घटना आणि निमित्त घडत आहेत की, हे नगरकर गांधी बातम्यांचे विषय बनले आहेत. अहमदनगरचे उपमहापौरपद हे त्यापैकीच एक निमित्त. 


छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि महापालिकेतील एका कर्मचाऱ्यावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केल्यामुळे जो श्रीपाद छिंदम टीकेचा विषय बनला आहे तो याच उपमहापौरपदावर होता आणि त्याला त्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे महत्कार्य केले होते याच दिलीपकुमार गांधी यांनी. ६८ सदस्यांच्या नगर महापालिकेत भाजपचे अवघे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. तरीही दीड वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजपने मिळून सत्ता काँग्रेस आघाडीकडून हिसकावून आपल्याकडे घेतली होती. त्या वेळी दिलीप गांधी यांच्या आशीर्वादानेच हे छिंदम महाशय उपमहापौर झाले. त्यामागची गांधी यांची 'प्रेरणा' काय होती, हे त्यांनाच ठाऊक. कारण श्रीपाद छिंदम हे काय प्रकरण आहे, याची गांधी यांना पूर्ण कल्पना होती. हा छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत यांच्या गुंडगिरीच्या विरोधात याच दिलीप गांधी यांनी काही वर्षांपूर्वी मोर्चा काढला होता. एक दुकान परस्पर मालकाकडून विकत घेऊन या बंधूंनी तिथल्या भाडेकरू व्यापाऱ्याला हुसकावून लावले होते. त्यासाठी त्यांनी दुकानातल्या सामानाचीही पर्वा केली नव्हती. त्या वेळी काँग्रेसमध्ये असलेल्या या छिंदम बंधूंविरोधात गेलेल्या व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी दिलीप गांधी यांनीच मोर्चा काढला होता. त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकीत गांधी यांनी छिंदमच्या चारित्र्याचे शुद्धीकरण करीत त्याला नगरसेवक आणि नंतर उपमहापौर केले. त्याने छत्रपतींबद्दल अपशब्द वापरले आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले तेव्हा गांधी यांनी पश्चात्ताप झाल्याचे सांगायला सुरुवात केली. आता उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पापक्षालन करण्याची 'गांधीगिरी' चालवली असली तरी त्यात काही तथ्य नाही, याची नगरकरांना कल्पना आहे. 


हे छिंदम प्रकरण ताजे असतानाच आणखी दोन प्रकरणांत हे गांधी अडकले. अहमदनगर शहरात असलेल्या फोर्डच्या शोरूमचे मालक भूषण बिहाणी आणि त्यांच्या दोन व्यवस्थापकांच्या अपहरण आणि खंडणी प्रकरणात दिलीप गांधींवर गुन्हा दाखल झाला आहे. काही वर्षांपूर्वी फोर्डच्या शोरूममधून गांधी यांनी एक मोेठी नवी गाडी नेली. काही दिवस वापरल्यावर त्यात दोष असल्याचे सांगत नवी गाडी मागितली. त्याला भूषण बिहाणी यांनी विरोध केल्यावर गांधी यांच्यासह त्यांच्या गुंडांनी शोरूममधल्या नव्या १० गाड्यांसह दोन व्यवस्थापकांचे आणि भूषण यांचे अपहरण केले. त्यांना अज्ञात स्थळी नेऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमेची खंडणी वसूल केली, अशी भूषण यांची तक्रार आहे. दिलीप गांधी यांचे 'कर्तृत्व' एवढे महान की स्थानिक पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची हिंमतही त्या वेळी केली नव्हती. शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशाने नुकताच त्यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यात त्यांच्या चिरंजीवांचाही समावेश आहे. याच गांधींनी आपल्या बंगल्याचे बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. 


अनेक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष राहिल्यामुळे असे अतिक्रमण करण्यात वाईट काय, असा विचार त्यांनी केला असावा. त्या संदर्भातही महापालिकेकडे वारंवार तक्रारी झाल्या होत्या. पण अतिक्रमण काढले जात नव्हते. अखेर न्यायालयाच्या बडग्यानंतर महापालिकेने नुकतीच त्यांच्या बांधकामाची मोजणी केली त्या वेळी तब्बल ९ फुटांची अतिरिक्त जागा व्यापली आहे, हे समोर आले. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याची नामुष्कीही खासदार गांधींवर आली आहे. 


हेच दिलीप गांधी गेल्या १०-१२ वर्षांपासून अहमदनगर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे नेतृत्व करीत आहेत. ११० वर्षे जुनी असलेल्या या बँकेने जिल्ह्यात आणि बाहेरही चांगला लौकिक मिळवलेला असला तरी गेल्या काही वर्षांत बँकेच्या व्यवहारांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. अलीकडेच जिल्ह्यातील काही डाॅक्टरांची मोठ्या रकमेची फसवणूक त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, तक्रार न नोंदवताच ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. नंतर त्यांची खासदार गांधी यांच्याशी चर्चा झाली, असे सांगण्यात येते. त्यामुळे बँकेची अब्रू वाचली असली तरी न नोंदवलेल्या तक्रारीच्या अंधारात काय काय दडले आहे, याबाबत कुतूहलही वाढले आहे. काही आजारांचे लवकर निदान होणेच बरे असते. अन्यथा जीव गमवावा लागतो. या बँकेचे तसे होऊ नये म्हणजे मिळवले. 

- दीपक पटवे, निवासी संपादक, औरंगाबाद 

बातम्या आणखी आहेत...