आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: कायद्याचे रक्षकच झाले भक्षक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांत चार राजकीय कार्यकर्त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यामुळे या जिल्ह्यात कायद्याचे राज्य शिल्लक आहे का, असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. ज्या वेळी गुंडगिरी करणारे गुन्हेगार अशी परिस्थिती निर्माण करतात त्या वेळी कायद्याच्या बडग्याने त्यांचे ते राज्य उद्ध्वस्त करता येऊ शकते; पण ज्या वेळी कायदा करणारेच कायदा हवा तसा वाकवतात आणि कायद्याचे राज्य उद््ध्वस्त करून आपल्या हिताची जोपासना करणारे राज्य निर्माण करू पाहतात त्या वेळी त्यांना काेण आणि कसे रोखणार, असा प्रश्न निर्माण होतो. अशी परिस्थिती गुंडाच्या राज्यापेक्षाही अधिक घातक असते. अहमदनगर जिल्ह्यात सध्या तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 


महिनाभरापूर्वी म्हणजे ७ एप्रिलला अहमदनगर शहरालगत असलेल्या केडगाव भागात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना भररस्त्यात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना (हे एकमेकांचे नातलग आहेत) आणि प्रत्यक्ष मारेकऱ्यांपैकी काहींना अटक करण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला अटक करण्याची हिंमत पोलिस करू शकतात, याचाच अर्थ तिथे कायद्याचे राज्य आहे, असा  नक्कीच घेता येऊ शकतो. पण ज्या वेळी एका हिंसक जमावाला शासन व्हावे म्हण्ून पोलिस त्यांच्यावरही गुन्हा दाखल करतात त्या वेळी त्या जमावाचे नेेते आपल्या हाती असलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून त्या जमावाला कारवाईपासून वाचवण्यात धन्यता मानतात. याला कसले राज्य म्हणायचे? शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर शिवसैनिक संतप्त होणे समजू शकते.

 

पण हा जमाव हिंसक होतो, तोडफोड करतो, हिंस्रपणे दगडफेक करतो आणि ती नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, अशी अपेक्षा करायची? तीही ज्यांच्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताची आणि मालमत्तेची रक्षा करण्याची जबाबदारी आहे त्यांनी? शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडे राज्याचे गृहराज्यमंत्रिपद आहे. त्यांनी त्या अधिकारात शिवसैनिकांवर पोलिसांनी लावलेले ३०८ कलम रद्द करायला लावले. याच शिवसेनेच्या आंदोलकांनी ‘दिव्य मराठी’च्या पत्रकारावर तो त्यांच्या हिंसात्मक कृतीचे फोटो काढतोय म्हणून भीषण हल्ला केला. त्याची कोणतीही दखल घ्यावी असे या गृहराज्यमंत्र्याला वाटले नाही.

 

उलट एकाही शिवसैनिकाला हात लावायचा नाही, असे आदेश त्यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाला दिलेले दिसतात. त्यामुळेच आजपर्यंत एकाही शिवसैनिकावर कारवाई करायची हिंमत पोलिस प्रशासनाने केेली नसावी. त्याच पद्धतीच्या कृतीसाठी त्याच कलमान्वये गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मात्र नियमाप्रमाणे कारवाई सुरू आहे. यातून हे सरकार जनतेला काय संदेश देते आहे? दीपक केसरकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आदेश मानून कारभार करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा; पण ज्या मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याचा मुख्य कारभार स्वत:कडे ठेवून घेतला आहे त्या देवेंद्र फडणवीस यांना ते मान्य आहे का? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे.

 

येणाऱ्या निवडणुकांत शिवसेनेने स्वतंत्र लढून मतविभाजन करू नये म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांची मनधरणी भाजप नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी खुशाल करावी, पण त्यासाठी राज्यातील कायदा-सुव्यवस्था पणाला लावलेले मुळीच चालणार नाही हे  सांगायची वेळ त्यांनीच आणली आहे. 


शिवसेना नेत्यांच्या खुनानंतर ११ दिवसांनीच जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवा कार्यकर्त्यांनाही गोळ्या घालून ठार करण्यात आले. आता पुढे कोणत्या पक्षाच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा नंबर लागतो की आपला, असा प्रश्न या जिल्ह्यातल्या नागरिकांना पडला आहे. यात स्थानिक पोलिस प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नाही हेच सिद्ध झाले आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे चांगली कामे करण्यासाठी नगर जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहेत. तशी कामे त्यांनी अवश्य करावीत; पण जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची किंमत देऊन नाही. नगर जिल्ह्यात सहजपणे कोणालाही गावठी बंदुका, कट्टे उपलब्ध कसे होत आहेत हे पाहणे हे पोलिस अधीक्षक या नात्याने रंजनकुमार शर्मा यांचे आद्य कर्तव्य होते.

 

चार खून झाल्यानंतर त्यांच्या टीमने शनिवारी चार कट्टे पकडले. हे करण्यासाठी चार जणांचा बळी जायलाच हवा होता का, हा प्रश्न आहे. हे खून आणि हाणामाऱ्यांमागे राजकारणच आहे की आणखी काही कारणे आहेत हेही गांभीर्याने तपासले जायला हवे. याच्या मुळाशी अवैध वाळू, व्याजाचे पैसे, भूखंडांचे व्यवहार अशीही कारणे असू शकतात. पोलिसांनी ते शोधायला हवे. त्यासाठी प्रशासनाबरोबरच राज्यकर्त्यांचीही इच्छाशक्ती सकारात्मक मात्र असायला हवी.


दीपक पटवे

निवासी संपादक, औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...