आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत सदस्य झोडगे यांचा जि. प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न, बोगस बिले काढणाऱ्यांवर कारवाईची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नागर देवळे ग्रामपंचायतीत रस्त्यांची कामे न करताच पूर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बिले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला. सुमारे १५ लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तातडीने पोलिसांनी झोडगे यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. झोडगे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली असता त्यांनी १९ मार्चपर्यंत चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले.

 

नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये २५/१५ योजने अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण खर्च दहा लाख, अंतर्गत गटारीचे काम २ लाख ५० हजार रुपयांचा दोन्ही कामांचा पूर्णत्वाचा दाखला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता व विभागीय अभियंता यांच्या स्वाक्षरीने १ सप्टेंबर २०१७ रोजी देण्यात आला आहे. याशिवाय १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मधुरानगरी येथे २ लाख ५० हजार खर्चून रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केल्याचा दाखला १० ऑगस्ट २०१७ रोजी देण्यात आला आहे. या पूर्णत्वाच्या दाखल्यांमुळे संबंधित कामांची बिलेही काढण्यात आलेली आहेत.

 

प्रत्यक्षात मात्र पूर्णत्वाच्या दाखल्याच्या दिनांकापूर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे कामे सदर ठिकाणी झालेले नाही. त्यामुळे या कामांची बोगस बिले काढून संबंधित अधिकारी, ठेकेदार व त्यांच्या इतर साथीदारांनी गैरव्यवहार करत सरकारी निधीचा अपहार केला आहे.
झोडगे यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या कामाची समक्ष पाहणी केली. नागरिकांचे जबाब घेतले, तरी पुढे काहीच कारवाई झाली नाही. पुन्हा त्यांनी ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्याबाबत मागणीपत्र दिले होते. त्यास दोन महिने होत आले आहेत, तरीही कारवाईस टाळाटाळ होत असून, या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी झोडगे यांनी केली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनदेखील संबंधितांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी मंगळवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांनी १९ मार्चपर्यंत चौकशी करून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी असलेल्या संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे लेखी आश्वासन दिले.

 

बातम्या आणखी आहेत...