आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहरामध्ये पतंगप्रेमींना चढला मकरसंक्रांतीचा ज्वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मकर संक्रांतीनिमित्त पतंग प्रेमींचा ज्वर चांगलाच वाढला आहे. शहरातील बाजारपेठेत थाटलेल्या पतंगांच्या स्टालमध्ये बहुरंगी पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आठवडाभरापासून पतंगप्रेमींची या उत्सवासाठी जय्यत तयारी होती. शनिवारी देखील पतंगांच्या स्टॉलबरोबरच तीळगूळ खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

 

संक्रांत हा पौष महिन्यातील सण असून दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते. संक्रात हा केवळ तीळगुळाचाच नव्हे, तर पतंगांचाही उत्सव आहे. पतंग उडवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याने लहान-थोरांनी पतंगाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पतंग खरेदी केले. चार दिवसांपासूनच पतंगप्रेमी शहरासह जिल्ह्यात आनंद लुटत आहेत. वुई कापे, खल्लास, गई रे अशा घोषणाबाजी करत पतंगाचा खेळ रंगलेला आहे. बाजारात बरेली, पांडा मांजाला मोटी मागणी आहे. शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक, बागडपट्टी, चितळेरस्ता, झेंडीगेट, सर्जेपुरा, लालटाकी, केडगाव, भिंगारसह विविध भागात पतंगांचे स्टाॅल सजले आहेत. लहान थोरांनी चकरी, तयार मांजा, पतंग खरेदीला प्रतिसाद दिला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत किरकोळ दरवाढ झाली असली, तरी पतंग प्रेमींचा उत्साह कमी झालेला नाही.


संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ, बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा असतो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू आहे. त्यामुळे तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे, अशीही प्रथा वर्षानुवर्षे सुरूच आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी शनिवारी भोगी साजरी करण्यात आली, घरोघरी 'खेंगटाचा' बेत आखण्यात आला. विविध पालेभाज्यांच्या दर ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचले असतानाही बाजारात कोणतीही तक्रार न करता भोगीनिमित्त खरेदीदारांची गर्दी दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...