आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; राजकीय वर्चस्वाची खुमखुमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्हा सहकार व राजकारणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील मानला जातो. शनिवारच्या घटनेने राजकारणातील गुन्हेगारीने कोणते टोक गाठले आहे हे अधोरेखित झाले. हे खून कोणत्या कारणांमुळे झाले हे अजून निश्चित झालेलेे नाही. तथापि, राजकीय वर्चस्वाची खुमखुमी, जमिनीचे व्यवहार, खासगी सावकारी या कारणांभाेवती सारे प्रकरण फिरते आहे.  राजकीय आश्रयाने चालणाऱ्या गुन्हेगारीने अक्राळविक्राळ रूप धारण केल्याचे पुरेेसे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सहज व अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या गावठी कट्ट्यांमुळेे या गुन्हेगारीला वेगळे परिमाण मिळाले. 


नगर शहरावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, त्यांचेच वडील विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप, भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले व केडगावात कोतकर असे राजकीय वर्चस्व आहे. हे चौघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. २५ वर्षे शिवसेनेच्या आमदारपदी राहिलेलेे अनिल राठोड आता ‘माजी’ असले तरी यांचाही एक ताकदवर राजकीय गट आहे. बाकीच्या पक्षांचे लोक संधी पाहून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या वळचणीला जातात. शनिवारी झालेली मनपाची पोटनिवडणूक तशी औपचारिकता होती. त्यामुळे या निवडणुकीतून मिळणारे नगरसेवकपद तसे अवघे आठ महिन्यांचे आहे. पण मनपाची निवडणूक, त्यानंतर येणारी लोकसभा व विधानसभेची निवडणूक पाहता नगरमधील काँग्रेस व शिवसेनेने ती प्रतिष्ठेची केली. केडगाव तसा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. भानुदास कोतकर हे त्याचे किल्लेदार. अलीकडच्या दोन निवडणुकांत मात्र या बालेकिल्ल्याला तडे गेले. तरीही एकूण सहा जागांपैकी पाच कोतकरांच्या ताब्यात आहेत. मनपा पोटनिवडणुकीतही कोतकरांचे पुतणे विशाल यांचाच विजय झाला. हा विजय निसटता असल्याने कोतकरांना व त्यांचे व्याही असलेल्या जगताप यांना विजयाचा पूर्ण आनंद साजरा करता आला नाही. 


निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असल्याने नगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही या निवडणुकीसाठी आपली ताकद पणाला लावली होती. मतदानाच्या दिवशी काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत अनेकदा बाचाबाची झाली. निकाल लागल्यावर सात तासांत नगर शहरासह जिल्हा हादरवून टाकणारे हे दोन खून झाले. पिस्तुलाच्या गोळ्यांबरोबरच त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. मृत्युमुखी पडलेले संजय कोतकर व वसंत ठुबे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या खुनानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड खवळले. शिवसेनेचे दीपक केसरकर, रामदास कदम आणि दिवाकर रावते हे तीन मंत्री रविवारी नगरमध्ये तळ ठोकून होते. रविवारी जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी बंदला मोठा, तर काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळाला.  कार्यकर्त्यांनी केडगावात अनेक ठिकाणी दगडफेक केली. माजी महापौर संदीप कोतकर यांचे कार्यालय फोडले. या बेभान कार्यकर्त्यांना कोणीही आवरत नव्हते. किंबहुना नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या कृत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची स्थिती होती. हीच स्थिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात घडवून आणली. खुनाच्या गुन्ह्यात आमदार संग्राम जगताप यांचे नाव असल्याने पोलिसांनी त्यांना तेथे बसवून ठेवले. पण वेळ जास्त गेल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला. आमदार जगताप नको म्हणत असतानाही कार्यकर्त्यांनी त्यांचे न ऐकता पोलिस अधीक्षक कार्यालयात मोठी तोडफोड करीत जगताप यांना तेथून अक्षरश: पळवून नेले. बिहार स्टाइल अशी घटना महाराष्ट्रात प्रथमच घडली. विशेष कोणत्याही नागरी प्रश्नावर राजकीय नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्याचे एकही उदाहरण नगरमध्ये घडलेले नाही. 


या खुनानंतर देण्यात आलेल्या फिर्यादीत दोन्ही आमदार जगताप, कर्डिले, सध्या जामिनावर असलेले भानुदास कोतकर व त्यांचे पुत्र संदीप यांची नावे आहेत. पहाटे आमदार संग्राम यांना अटकही झाली. कोणत्याही क्षणी अरुण जगताप व कर्डिले यांनाही अटक होऊ शकते, अशी स्थिती आहे. तसे झाल्यास तीन आमदारांवर कोठडीत बसण्याची वेळ येणार आहे. ही अपवादात्मक स्थिती नगरमध्येच घडलेली असेल. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस व त्यांची गुप्तवार्ता शाखा काय करते हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करण्याचे धाडस कार्यकर्ते करू शकतात यावरून पोलिसांचा अजिबात धाक उरलेला नाही हे स्पष्ट झाले. केडगावात आलेल्या पोलिसांच्या बसमध्ये अवघे सात जवान होते. हिंसक झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांपुढे त्यांनाही पळ काढून सुरक्षित जागी आश्रय घ्यावा लागला. पोलिसांच्या गुप्तवार्ता शाखेला अशा घटनांची अजिबात चाहूल लागत नाही ही बाब सर्वाधिक चिंताजनक आहे. या राजकीय गुन्हेगारीमुळे सामान्यांच्या दैनंदिन जीवनाची मात्र सातत्याने ससेहोलपट होत आहे.


- मिलिंद बेंडाळे

बातम्या आणखी आहेत...