आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा आपत्कालीन आराखडा यंदाही कागदावरच; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उघडी गटारे, खड्ड्यांनी चाळण झालेले रस्ते, अस्ताव्यस्त पसरलेला कचरा, दुर्गंधी हे चित्र सध्या शहराच्या सर्वच भागांमध्ये दिसत आहे. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना अनेेक संकटांना तोंड द्यावे लागणार याचे हे चिन्ह आहे. महापालिकेने नेहमीप्रमाणेच यंदाही पावसाळ्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संपूर्ण शहराच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दरवर्षी महापालिकेतर्फे आपत्कालिन आराखडा तयार केला जातो. नालेसफाई, धोकादायक इमारती, तुंबलेले गटारे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच सक्षम अारोग्य यंत्रणेबाबतच्या उपाययोजना आपत्कालिन आराखड्याद्वारे केल्या जातात. मात्र, पावसाळा सुरू झाला, तरी या उपाययोजना अद्याप कागदावरच आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागांत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या पॅचिंगचे काम होणे आवश्यक होते. परंतु पॅचिंग न झाल्याने रस्त्यावरील खड्डे उघडे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. 


मागील वर्षी शहराच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी तर नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातून जाणाऱ्या लहान-मोठ्या २२ आेढ्या-नाल्यांच्या साफसफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. धोकादायक इमारतींकडेदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. भरलेल्या कचराकुंड्या उचलेल्या उचललेल्या नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


घरात पाणी घुसते अशी ठिकाणे 
सोनानगर, रासनेनगर, एम्लॉयमेंट आॅफिस परिसर, दत्त मंदिर, मानधना फॉर्म, सिव्हिल हडको, रामवाडी, जाधव मळा, हॉटेल दिल्ली दरबार, सर्वोदय कॉलनी, बागरोजा हडको, नालेगाव हडको, दातरंगे मळा, ठाणगे मळा, टिळक रस्ता, पडोळे चाळ, विनायकनगर. 


प्रमुख उपाययोजना...
- सीना नदीची पूररेषा निश्चित करणे. 
- नदीपात्रातील अतिक्रमणधारकांना नोटिसा. 
- आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे 
- धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही करणे 
- साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा 
- घरांमध्ये पाणी घुसल्यास सक्शन युनिट तयार ठेवणे 
- शहरातील स्वयंसेवी संस्था व संघटनांची यादी तयार करणे 
नागरिकांच्या जागृतीसाठी आपत्कालिन शिबिर घेणे. 


धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष 
महापालिका प्रशासन दरवर्षी ५० ते ६० पानांचा आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा तयार करते. ओढ्या-नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले, धोकादायक इमारत कोसळली, तसेच साथीचे आजार पसरल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा ऊहापोह आरखड्यात करण्यात येतो. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही या आराखड्याची अंमलबजावणी झालेली नाही. पावसाळा सुरू झाला, तरी हा आराखडा अद्याप कागदावरच आहे. 

बातम्या आणखी आहेत...