आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायणगिरी पतसंस्थेच्या कार्यालयाला अखेर सील; शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे ग्रामस्थ संतप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासेफाटा- शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी रविवारी पाथरवाले गावात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांनी संबंधित पतसंस्थेच्या कार्यालयाला सील ठोकले आहे. 


कर्जाची रक्कम देण्यास पतसंस्थेने टाळाटाळ केल्याने नेवासे तालुक्यातील पाथरवाले येथील शेतकरी राजेंद्र अासाराम गवळी (४०) यांनी शनिवारी सकाळी कुकाण्यातील नारायणगिरी पतसंस्थेच्या आवारातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुदाम नारायण खाटीक (सुलतानपूर) व उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र खाटीक (पाथरवाला) या दोघांविरूद्ध राजेंद्रच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा ३०६ गुन्हा नोंदवला असून उपाध्यक्ष दत्तात्रय खाटीक यास अटक केली. 


याप्रकरणी रामेश्वर भाऊसाहेब गवळी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, राजेंद्र गवळी शेती करत होता. सात महिन्यांपूर्वी त्याने नारायणगिरी पतसंस्थेकडे साडेपाच लाखांचे कर्जप्रकरण केले होते. हे कर्ज मंजूर करण्यापूर्वीच राजेंद्रच्या शेतीवर बोजा चढवत अनामत भरण्याची मागणी पतसंस्थेने केली. राजेंद्रने ७० हजार रूपये अनामत भरली होती. कर्जाची रक्कम मंजूर झाल्यानंतर ही अनामत परत देण्याचे ठरले होते. पतसंस्थेने राजेंद्रचे कर्ज दोन महिन्यांपूर्वीच मंजूर केले होते. साडेतीन लाखांचा धनादेश पतसंस्थेचा व्यवस्थापक कृष्णा गव्हाणे याने राजेंद्रची सही घेऊन वटवला. राजेंद्र कर्जाच्या रकमेची मागणी करत असताना व्यवस्थापकाने संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी सांगितल्यावरच तुला रक्कम मिळेल, असे सांगितले. राजेंद्र रक्कम मिळण्यासाठी पतसंस्थेत चकरा मारू लागला. पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षंनी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने रक्कम देण्यास टाळाटाळ केली. राजेंद्रचे राजकीय प्रस्थ वाढत चालले होते. त्यामुळे कर्जप्रकरणी राजेंद्रची अडचण करण्याचा डाव संस्थेच्या उपाध्यक्षांनी रचला होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. 


इशाऱ्याकडे केले दुर्लक्ष 
पतसंस्थेने मंजूर कर्जाची रक्कम द्यावी; अन्यथा ६ जूनला तहसील कार्यालयाच्या आवारात आत्महत्या करणार असल्याचे निवेदन राजेंद्रने पोलिस यंत्रणेसह सर्वांना दिले होते. सहायक निबंधकांसह पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने १५ पर्यंत ही रक्कम व झालेला खर्च देऊ, असे सांगितले होते. पण हे सहायक निबंधकाने गांभीर्याने घेतले ना पतसंस्थेने. 


राखीव पोलिस दल तैनात 
राजेंद्र सकाळी अकराच्या दरम्यान पतसंस्थेच्या कुकाण्यातील कार्यालयात आला. कार्यालयातच त्याने विषाची बाटली काढत विषप्राशन केले. त्याला त्वरित नगरच्या सरकारी रूग्णालयात हलवण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. राजेंद्र मरण पावल्याचे कळताच पाथरवाला येथील मोठा जमाव कुकाणा पोलिस दूरक्षेत्रासमोर जमला. पोलिसांनी राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या पाचारण केल्या. 


गवळी कुटुंबास दहा लाखांची मदत द्या... 
पतसंस्थेच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेल्या पाथरवाले येथील शेतकरी राजेंद्र गवळी यांच्या कुटुंबास शासनाने १० लाख रुपयांची मदत करावी, तसेच या प्रकरणी गांभीर्यपूर्वक दखल न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास कोरडे यांनी रविवारी पत्रकाद्वारे केली. 

बातम्या आणखी आहेत...