आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औटघटकेचा नगरसेवक होण्यासाठी 'भाऊ'गर्दी, प्रभाग 32 व 34 मध्ये उताविळांची 'फिल्डिंग'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रभाग क्रमांक ३२ (ब) चे काँग्रेसचे नगरसेवक संदीप कोतकर यांचे नगरसेवकपद लांडे खून प्रकरणी शिक्षा लागल्यानंतर रद्द ठरवण्यात आले होते. तसेच प्रभाग ३४ (ब) मधील नगरसेवक संजय लोंढे यांचे पदही पक्षादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रद्द करण्यात आले होते. दोन्ही प्रभागांतील रिक्त जागांसाठी एप्रिल २०१८ मध्ये निवडणूक घेण्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे. त्यामुळे आतापासून दोन्ही प्रभागांत अवघ्या दहा महिन्यांच्या काळासाठी उताविळांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. इच्छुकांमध्ये भाऊबंदांचा मोठा भरणा आहे. ही पोटनिवडणूकही चर्चेची ठरणार आहे.

 

केडगाव हे उपनगर किमान पाऊण लाख लोकसंख्येचे आहे. केडगाववर भानुदास कोतकर यांचे एकछत्री वर्चस्व होते. गेल्या दोन निवडणुकांपासून त्याला तडा गेला. कारण एका निवडणुकीत सातपैकी दोन जागा विरोधकांना मिळाल्या. गेल्या वेळच्या निवडणुकीत एक जागा शिवसेनेने राखली. आता कोतकर व त्यांचे तीन पुत्र अशोक लांडे खून प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. संदीप कोतकर यांचे नगरसेवकपदही त्यामुळेच रद्द झाले. सध्या या उपनगराची स्थिती निर्णायकी झाली आहे. त्यामुळे कोतकर विरोधकांनी या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उचल खाल्ली आहे.

 

महापालिकेच्या डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग ३२ (ब) मध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांनी २५१६ मते मिळवून विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ शिवसेनेचे विजय मोहन पठारे १ हजार ३५० मते मिळवून पराभूत झाले होते. याच प्रभागात ७४ मतदारांनी नोटाचा अधिकार बजावला होता.

 

दरम्यान अशोक लांडे खून प्रकरणात संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. तसेच महापालिकेत जून २०१५ मध्ये झालेल्या नूतन महापौर निवडीच्यावेळी राजकीय पक्षांनी पक्षादेश (व्हीप) बजावला होता. तथापि काँग्रेसचे लोंढे यांनी सभागृहात गैरहजर राहिले होते. याचा फायदा शिवसेनेला मिळाल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते कोतकर यांनी लोंढे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. त्यावर आयुक्तांनी लोंढे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश देण्यात आला होता.

 

निवडणूक आयोगाने ३२ ब व ३४ ब या प्रभागांतील पोटनिवडणूक एप्रिल २०१८ मध्ये घेण्याचे जाहीर केले आहे. १० जानेवारीला जाहीर केलेल्या विधानसभेच्या मतदार यादी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. दोन्ही प्रभागांत पोटनिवडणुकीचा ज्वर आतापासून चढायला सुरुवात झाली आहे. फलकबाजीतून आगामी उमेदवारांचे दर्शन घडवण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. केडगावात सर्वत्र अशा बड्या फलकांचे साम्राज्य दिसू लागले आहे. उमेदवारी मिळते, की नाही पण अनेक 'तरुण' व 'तडफदार'इच्छुकांनी कंबर कसली आहे. मध्यंतरी एका अशा उमेदवाराने जंगी पार्टी दिल्याचीही चर्चा रंगली आहे. निवडणुकीसाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून उमेदवारी खिशात घालण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. सध्या पक्षीय पातळीवरूनही इच्छिकांनी चाचपणी सुरू केली आहे. अनेकजण पक्षांच्या उमेदवारीवर अवलंबून असले, तरी पक्षीय उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यामुळे केडगावातील ही पोटनिवडणूक अनेकरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...