आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर मनपा कर्मचारी सातपुते पोलिसांना सापडेना, पाेलिसांच्या कार्यपध्दतीबाबत उलटसुलट चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लाचखोर कर्मचारी कसा असावा, याचे महापालिका कर्मचारी रोहिदास सातपुते हा उत्तम उदाहरण आहे. महापालिकेत ३६ लाख ६५ हजार रुपयांचा घोटाळा करणारा हा मास्टरमाईंड आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. अधिकारी असो की, पदाधिकारी त्याला मॅनेज करण्याचा हातखंडा असलेला फरार आरोपी सातपुते सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 

पथदिवे घोटाळ्यात सातपुते याने सर्वाधिक ५ लाख रुपयांची लाच घेतल्याचा जबाब अटकेत असलेला ठेकेदार सचिन लोटके याने दिला आहे. निलंबित उपायुक्त विक्रम दराडे यांनी दोन लाख रुपये, तर कॅफो दिलीप झिरपे यांनी एक लाख रुपये घेतले असल्याचा धक्कादायक खुलासा लोटके याने केला आहे.

 

महापालिकेत ३६ लाख ६५ हजार ४४१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी विद्युत विभाग प्रमुख रोहिदास गजानन सातपुते (गुलमोहर रस्ता, नगर) ठेकेदार सचिन सुरेश लोटके (३६, श्रीराम चौक, सावेडी, नगर), कर्मचारी बाळासाहेब चंद्रकांत सावळे (त्रिदल बिल्डिंग, माळीवाडा, नगर) व भरत त्र्यंबक काळे (तपोवन रोड, सावेडी, नगर) या चौघांच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाशी संबंधित प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आरोपी सचिन लोटके व भरत काळे या दोघांना पोलिसांनी गजाआड केले. परंतु या गुन्ह्यातील मास्टरमाईंड व लाचखोर आरोपी सातपुते अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. सातपुते याने महापालिकेत लाखो रुपयांचे घोटाळे केलेले आहेत. परंतु राजकीय वजन वापरून त्याने हे सर्व घोटाळे पचवले आहेत. अाता तर तो तब्बल ३६ लाख रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी आहे. विद्युत विभागप्रमुख या नात्याने ताच या घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहे. त्यामुळे त्याला आतापर्यंत अटक होणे आवश्यक होते. मात्र, मोठमोठ्या गुन्हेगारांना वठणीवर आणणाऱ्या पोलिसांना सातपुते अद्याप सापडलेला नाही. विशेष म्हणजे महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मॅनेज करण्यात सातपुते याचा मोठा हातखंडा आहे. त्याने हा हातखंडा पोलिसांसाठी वापरला की काय, अशी शंका महापालिका वर्तुळातून सध्या व्यक्त होत आहे.


उपायुक्त व कॅफो लाचखोर?
पथदिवे बसवण्यासाठीची बनावट कागदपत्रे तयार करून, तसेच त्यावर मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांच्या खोट्या सह्या करून संगनमताने हा गैरव्यवहार करणाऱ्या चाैघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. परंतु आता या प्रकरणात निलंबित उपायुक्त विक्रम दराडे, मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे, तसेच महापौर कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देवकर यांची नावे पुढे आली आहेत. या प्रकरणात दराडे यांनी दोन लाख, झिरपे यांनी एक लाख, तर देवकर यांनी एक लाख रुपये घेतल्याचा जबाब अटकेत असलेला ठेकेदार सचिन लोटके याने दिला आहे. त्याचबरोबर मास्टर माईंड आरोपी सातपुते याने पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा खुलासा लोटके याने केला आहे.

 

कोट्यवधींची मालमत्ता आली कोठून?
सातपुते हा महापालिकेत नोकरीला लागण्यापूर्वी फाटका माणूस होता. त्याच्या वडिलांची छोटी टपरी होती. परंतु आज याच सातपुतेकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. गुलमोहर रस्त्यावरील त्याचा बंगलाच कोट्यवधी रुपयांचा आहे. पिंपळगाव पिसा येथेही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता सातपुते याने कशी कमावली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधकशी अनेकदा पत्रव्यवहार केला. संबंधित विभागाने चौकशीचा फार्स केला, परंतु पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. सातपुते याचे काही नातेवाईक पोलिस विभागात आहेत, त्याचाच तो गैरफायदा घेत आहे.
- शाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...