आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे घोटाळ्याचा तपासच आता संशयाच्या भोवऱ्यात, तपास अधिका-याच्‍याच चौकशीची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेतील ३६ लाख ६५ हजारांच्या पथदिवे अपहार प्रकरणाचा तपासच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी आरोपींना पाठीशी घातले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला. सपकाळे यांची चौकशी करून हा तपास अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा, तसेच सपकाळे यांचे रायटर मंगेश खरमाळे यांचे कॉल डिटेल्स तपासावेत, अशी मागणी शेख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आता शर्मा काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पथदिवे घोटाळ्यातील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. विद्युत विभागप्रमुख रोहिदास गजानन सातपुते, ठेकेदार सचिन सुरेश लोटके, कर्मचारी बाळासाहेब चंद्रकांत सावळे व भरत त्र्यंबक काळे अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सातपुते याने ५ लाख, निलंबित उपायुक्त विक्रम दराडे याने २ लाख, कॅफो दिलीप झिरपे याने एक लाख व महापौर कार्यालयातील कर्मचारी शशिकांत देवकर याने एक लाख अशी एकूण ९ लाखांची लाच घेतल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी उपायुक्त दराडे व कॅफो झिरपे यांना अटक केली. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने दोघांना सशर्त जामीन मंजूर केला.

 

घोटाळ्यातील सर्व कागदपत्रांवर प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्या साक्षऱ्या आहेत. कोणतेही निकष पूर्ण न केलेल्या ठेकेदाराला त्यांनी काम दिले. कामाची तांत्रिक मान्यता व कार्यारंभ आदेशदेखील सोनटक्के यांनीच दिला आहे. कामाच्या देयकावर त्यांच्याच स्वाक्षऱ्या आहेत. असे असतानाही पोलिस निरीक्षक सपकाळे हे सोनटक्केंविरोधात कोणतीच कारवाई करत नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनीदेखील काम झालेले नसताना काम झाल्याचा खोटा पाहणी अहवाल दिला. या प्रकरणाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी पोलिसांपासून खरी स्थिती लपवून ठेवली. सोनटक्के, वालगुडे, प्रभाग अधिकारी यांच्यासह गुन्हे दाखल असलेल्या आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला आहे. तपासी अधिकारी सपकाळे मात्र आरोपींना पाठिशी घालत आहेत. सपकाळे यांची चौकशी करून हा तपास अन्य अधिकाऱ्याकडे द्यावा, अशी मागणी शेख यांनी पोलिस अधीक्षक शर्मा यांच्याकडे केली.

 

का सापडेना आरोपी?
पोलिसांना सराईत गुन्हेगार सापडतात, परंतु सातपुतेसारखा गुन्हेगार सापडत नाही. उपायुक्त व कॅफो या दोन्ही आरोपींना पोलिस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. त्यांना दोन दिवसांत जामीनही मिळाला, परंतु भरत काळे याला पोलिसांनी दीड महिन्यापासून कोठडीत ठेवले आहे. आरोपींना पाठिशी घालण्याचे काम तपासी अधिकारी करत आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
- शाकीर शेख, सामाजिक कार्यकर्ते.  


फरार आरोपी सातपुते 'मॅनेज गुरू'
पथदिवे घोटाळ्यातील मास्टरमाईंड व लाचखोर आरोपी सातपुते अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. सातपुतेने लाखो रुपयांचे घोटाळे केले आहेत. राजकीय वजन वापरून त्याने हे सर्व घोटाळे पचवले. विद्युत विभागप्रमुख या नात्याने ताेच या घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहे. त्यामुळे त्याला अटक होणे आवश्यक होते. मात्र, मोठमोठ्या गुन्हेगारांना वठणीवर आणणाऱ्या पोलिसांना सातपुते सापडत नाही. मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मॅनेज करण्यात सातपुतेचा हातखंडा आहे.

 

अशा आहेत मागण्या
- सोनटक्के यांना गुन्ह्यात अटक करावी
- गुन्ह्यातील कलमे वाढवण्यात यावीत
- सपकाळे यांची चौकशी करावी
- गुन्ह्याचा तपास अन्य अधिकाऱ्याकडे द्यावा
- रायटर खरमाळे यांचे कॉल डिटेल्स तपासावेत
- तोफखाना ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे


ते निवेदन माझ्याकडे आलेच नाही
पथदिवे घोटाळ्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, तपासाबाबत कोणी निवेदन दिले, याबाबत अद्याप काहीच माहिती नाही. पोलिस अधीक्षकांकडे निवेदन दिले असले, तरी त्याबाबतची कोणतीच माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे मला काही बोलता येणार नाही.
- सुरेश सपकाळे, तपासी अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...