आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: कुख्यात आरोपी अजहर शेख पोलिसांच्या ताब्यात, नगरसेवकासह 5 जणांना मारण्याची केली होती तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कुख्यात व विकृत म्हणून ओळखला जाणारा अजहर मंजूर शेख (३६ , बेलदार गल्ली, सर्जेपुरा) याच्यासह सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. सावेडी उपनगरातील भिस्तबाग महालाजवळ दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा लावून या आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून पाच गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. नगरसेवक समद वहाब खान यांच्यासह ५ जणांना संपवण्याचा कट आरोपी अजहर याने रचला होता, अशी माहिती पोलिस तपासाात पुढे आली आहे.

 

अझहर हा त्याच्या साथीदारांसह औरंगाबाद रस्त्यावरील पेट्रोलपंप लुटण्यासाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. पवार यांच्या पथकाने सावेडी उपनगरातील भिस्तबाग महाल परिसरात शनिवारी मध्यरात्री सापळा लावून अजहरसह त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून ५ गावठी कट्टे, ३० जिवंत काडतुसे, २ स्वतंत्र मॅग्झिन, एक चारचाकी, ९ मोबाइल असा तीन लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अझहर मंजुर शेख (३६, रा. बेलदार गल्ली, सर्जेपुरा), सोमनाथ उत्तम दळवी (२३, रा. भिस्तबाग चौक), गुड्डू उर्फ शहानवाज हमीद सय्यद (३७, रा. नॅशनल कॉलनी, महेराज मज्जिद जवळ, मुकुंदनगर), सचिन कोंडीराम जाधव (२५ , रंगोली हॉटेलमागे, भूषणनगर, केडगाव), सिद्धेश संदीप खरमाळे (२० , रा. भांडगाव, ता. पारनेर) व एक अल्पवयीन अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.


किशोर आरणे (रा. दूधसागर चर्चजवळ, सोनेवाडी रस्ता, केडगाव) हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. अझहर याच्यासह पकडलेल्या आरोपींवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुकुंदनगर उपनगरातील नगरसेवक समद वहाब खान यांच्यासह ५ जणांना संपवण्याचा कट अजहर याने रचला होता. त्यासाठीच ५ गावठी कट्टे आणल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी दिली. अझहर हा साथीदारांसह औरंगाबाद रस्त्यावर पेट्रोलपंप लुटण्यासाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भिस्तबाग महाल परिसरात सापळा लावून अजहर याच्यासह इतर आरोपींना जेरबंद केले. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, संदीप पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्टे, रवी कर्डिले, अण्णा पवार, मन्सूर सय्यद, सोन्याबापू नाणेकर, उमेश खेडकर, भाऊसाहेब काळे, सुनील चव्हाण, रवि सोनटक्के, भागिनाथ पंचमुख, दीपक शिंदे, योगेश सातपुते, विशाल दळवी, देविदास काळे यांच्यासह जवळपास ३५ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

मध्यरात्री कारवाई
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे भिस्तबाग महालाजवळ शनिवारी मध्यरात्री सापळा लावला. सुरवातीला वेगात आलेली मोटारकार पोलिसांनी अडवली. त्यामागून दुचाकीही वेगात येत होती. पोलिसांनी अडवल्याचे दिसताच दुचाकीस्वाराने परत वळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोटारकारमधील ५ जण व दुचाकीचा पाठलाग करुन एकास पकडले. एकजण मात्र उडी मारुन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आरोपीकडे मिळून आलेले गावठी कट्टे कोठून आणले, यासह अन्य बऱ्याच बाबी तपासात समोर येतील, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली.


पत्नी रुक्सारच्या हत्येचे गूढ कायम
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी अजहर याच्या आलमगीर येथील घराला पेट्रोल व डिझेल टाकून आग लावण्यात आली होती. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली. आगीत अजहरसह त्याची पत्नी रुक्सार ऊर्फ गुरिया अजहर शेख (२५) गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अजहरची पत्नी रुक्सारचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्व जबाब देताना रुक्सार हिने आरोपी सादिक शेख, जुबेर सय्यद, आजम खान यांच्यासह १५ जणांनी घरात प्रवेश करत पेट्रोल टाकून आग लावल्याचे सांगितले. त्यानुसार भिंगार पोलिसांनी आरोपींच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकरणाचे गूढ कायम असतानाच मृत रुक्सार हिचा पती व कुख्यात आरोपी अजहरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मृत रुक्सार हिच्या मृत्यूप्रकरणी अजहरचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काही संबंध आहे का, हेदेखील पुढील तपासात निष्पन्न होणार आहे.

 

नगरसेवकाला मारण्याचा कट
नगरसेवक समद वहाब खान ऊर्फ समदखान यांच्याशी अजहर याचे पूर्ववैमनस्य आहे. अजहरने नगरसेवक समद खान यांच्यासह शहा निजाम नन्नेमिया, सादिक अल्लाबक्ष शेख, आझीम हनिफ खान व जुबेर बाबामियाँ सय्यद या पाच जणांना संपवण्याचा कट केला होता. त्यासाठी त्याने ५ गावठी कट्टे आणले होते.

 

बातम्या आणखी आहेत...