आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा जलाशयात बुडणारी महिला व तिच्या 2 मुलींना वाचवले; ग्रामस्थांनी केला सत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- मुळा धरणात बुडणारी महिला व तिच्या २ मुलींना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. पोटात पाणी गेलेल्या आराध्या या चिमुकलीला विळदघाटातील विखे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत सुधारत आहे. 


चमोरी गेस्टहाऊसच्या गोडाऊनजवळ रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. भारती साहेबराव जाधव (मुळानगर) ही महिला कपडे धुण्यासाठी धरणाच्या पाणवठ्याजवळ गेली होती. किरण व आराध्या या २ मुली आईबरोबर होत्या. आई कपडे धूत असताना काही अंतरावर खेळणारी आराध्या पाय घसरून पाण्यात पडली. आपली बहीण पाण्यात पडल्याचे लक्षात येताच किरणने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघीही बुडू लागल्या. जीवाच्या आकांताने या दोन्ही बहिणींनी आरडाओरडा केला. 


मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आईने क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात झेप घेतली. तथापि, तिलाही पोहता येत नसल्याने तिघी मायलेकी पाण्यात बुडू लागल्या. ही घटना परिसरातील शशिकला बर्डे, शारदा अनिल शिंदे, अश्विनी बाळासाहेब मोरे यांनी पाहिली. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडणाऱ्या तिघी मायलेकींना बाहेर काढण्यास मदत केली. 


मुळानगर वरवंडीचे सरपंच अंकुश बर्डे व गणेश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोटात पाणी गेल्याने बेशुद्ध झालेल्या आराध्याला ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आराध्याला विखे रूग्णालयात न्यावे लागले. पाण्यात बुडणाऱ्या मायलेकींचे जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या शशिकला बर्डे, शारदा शिंदे व अश्विनी मोरे यांचा मुळानगर येथील ग्रामस्थांनी सत्कार केला. 
 


सूचनांकडे पर्यटकांचे दुर्लक्ष 
मुळा धरणावरील चमोरी गेस्टहाऊसजवळ पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. धरणाच्या पाण्यात प्रवेश करू नये, असे सूचनाफलक मुळा पाटबंधारे विभागाने धोक्याच्या ठिकाणी लावले असतानादेखील पाण्यात उतरण्याचे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...