आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनवाणी पळण्याचा जागतिक विक्रम शिर्डीच्या मॅरेथॉनने काढला मोडीत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त आयोजित साई इंटरनॅशनल मॅरेथाॅनला देश-विदेशांतील धावपटूंनी रविवारी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेत १० हजार ६०० धावपटूंनी भाग घेतला. या मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतली. विशेष म्हणजे अनवाणी पळण्याच्या शिर्डीच्या मॅरेथॉनने जागतिक विक्रम मोडीत काढला. चीनमध्ये मागील वर्षी १०० मीटर अनवाणी धावण्याच्या स्पर्धेत १३३० धावपटूंनी सहभाग घेतला होता. शिर्डीत दोन किलोमीटर अनवाणी धावण्याच्या स्पर्धेत ७४२० धावपटूंनी भाग घेतला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

 

पुण्यातील चॅम्प एन्डोरेन्स या संस्थेने मॅरेथाॅनचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष योगिता शेळके, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते, अभय शेळके, सचिन तांबे, विशेष सुरक्षा विभागाचे पाेलिस महासंचालक कृष्णप्रकाश उपस्थित होते. सकाळी साडेसहाला शिर्डी ते एअरपोर्ट या मार्गावर ही स्पर्धा घेण्यात अाली. १८ ते ७० वयोगटातील १०,६०० धावपटूंनी भाग घेतला. ३, ५, १०, २१ व ४२ किलोमीटर या प्रकारात स्पर्धा घेण्यात अाली. माउंट एव्हरेस्ट सर केलेले एकमेव भारतीय धावपटू ब्रीज शर्मा, भारतीय जलद अनवानी धावपटू थॉमस बॉबी फिलिप्स यांच्यासह केनिया व इथोपियातील धावपटूंनी भाग घेतला. विविध गटात पहिल्या तिघा धावपटूंना १० लाखांची रोख बक्षिसे, ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. मॅरेथाॅन यशस्वी करण्यासाठी चॅम्स एन्डोरेन्सचे अरविंद बिजवे, निखील शहा, अॅड. शशी हिरे, राजेंद्र वाणी, विशाल मंगळोलकर यांनी प्रयत्न केले.

 

दरम्यान, साईंच्या समाधी शताब्दी वर्षात अांतरराष्ट्रीय मॅरेथॉन व्हावी, ही आपली इच्छा पूर्ण झाली. या मॅरेथानची दखल गिनिज बुक ऑप रेकॉर्डने घेतली आहे. चीनमध्ये १०० मीटर अनवाणी स्पर्धेत १३३० धावपटू उतरून विश्वविक्रम केला होता. शिर्डीच्या मॅरेथॉनमध्ये दोन किलोमीटर अंतराच्या अनवाणी ७४२० धावपटू धावून चीनचा विश्वविक्रम मोडीत निघाला, असे विशेष सुरक्षा विभागाचे महासंचालक कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

 

अशा गटांत झाली मॅरेथॉन
पहिला वयोगट : १८ ते ३०, दुसरा वयोगट : ३० ते४०, तिसरा वयोगट : ४० ते ५०, चौथा वयोगट : ५० ते ६०, पाचवा वयोगट : ६० ते ७० सर्वांसाठी अनवाणी धावण्याचा गट

 

पुढील वर्षीही सहकार्य करू
जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या नगरीत जागतिक दर्जाच्या मॅरेथॉनने नवा उच्चांक केल्याबद्दल अभिमान वाटतो. शिर्डीत आलेले देश-विदेशातील धावपटू साईंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करतील. पुढील वर्षी ही मॅरेथॉन भव्य होण्यासाठी आयोजकांना सहकार्य करू.
- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते.

बातम्या आणखी आहेत...