आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर भगवे, अलोट उत्साह, जागोजागी स्वागत; जय भवानी, जय शिवाजी... जयघोषाने शहर दुमदुमले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आगामी महापालिका निवडणूक, एकमेकांना शह देण्याचे कटकारस्थान, तसेच शिवरायांबद्दल भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने केलेल्या बेताल वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर यंदाची शिवजयंती (तिथीनुसार) मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणा.. ढोल-ताशांचा गजर, हातात भगवे झेंडे घेतलेली तरुणांची मोटारसायकल रॅली, तर वेगवेगळ्या मंडळांच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर थिरकलेली तरुणाई.. अशा जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मिरवणूक निघाली. सर्वच राजकीय संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. 


शहरातील कापडबाजार, चितळे रोड, दिल्ली गेट, माळीवाडा, आशा चौक, महात्मा फुले चौक, इंपिरियल चौक, सर्जेपुरा, तोफखाना, सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग चौक, श्रीराम चौक, एकविरा चौक, केडगाव, बोल्हेगाव, भिंगार व एमआयडीसी भागात चौका-चौकांत शिवाजी महाराजांचे पुतळे, तसेच प्रतिमा मांडून पूजन करण्यात आले. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत शहरातील विविध चौकांमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महापौर सुरेखा कदम, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अनिल शिंदे, उमेश कवडे, तसेच शिवसेनेचे सर्वच नगरसेवक शिवजयंती सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. माळीवाडा येथील शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 


तरुणांनी जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करत शहरातून मोटारसायकल रॅली काढली. काही संघटनांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरामध्ये दुपारीच शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. वेगवेगळ्या मंडळांच्या शहर व उपनगरातून दिवसभर मोटारसायकल रॅली सुरू होत्या. युवा संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व युवक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. चौकाचौकात सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकायला मिळत होते. त्यामुळे संपूर्ण शहरात शिवरायांचा जयघोष संचारला होता. लहान-थोर सर्वच शिवमय झाले होते. घराेघरीदेखील शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. रात्री उशिरापर्यंत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक सुरू होती. अन्य संघटनांनीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. 


वातावरण शिवमय 
हत्ती, घोडे, ढोल, ताशे, लेझीमच्या गजरात शिवरायांची पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. शिवसेनेने गेल्या चार दिवसांपासून या शिवजयंती सोहळ्याची तयारी केली होती. कायनेटिक चौक, नेता सुभाष चौक, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणी सकाळपासूनच शिवमय वातावरण निर्माण झाले होते. छत्रपतींच्या अभिवादनाचे मोठे फलक प्रत्येक चौकात लागले होते. नगर-पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौक ते केडगाव उपनगरापर्यंतच्या दुभाजकावर भगवे झेंडे लावण्यात आले. शहरातही जागोजागी असेच झेंडे लावण्यात आले, त्यामुळे संपूर्ण शहर भगवे झाले होते. 


चोख बंदोबस्त 
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दोन दिवस आधीच बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील बंदोबस्ताचे चोख नियोजन केले होते. वाहतूक पोलिसांना वेळेत हजर राहून वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कोतवाली व तोफखाना पोलिसांकडे बंदोबस्ताची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली होती. शिवजयंतीची मिरवणूक कोणतेही गालबोट न लागता वेळेत मार्गी लागावी, यासाठी मिरवणूक मार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छिंदम प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीगेट येथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता मिरवणूक पार पडली. 

बातम्या आणखी आहेत...