आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने पोलिसांमार्फत 'मामां'ची हत्या केली; विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आमदार संग्राम जगताप हे राजकारणात वरचढ झाले आहेत. त्यांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, या भीतीपोटी शिवसेनेने सत्तेचा वापर करत जगताप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवले. पोलिसांवर दबाव आणून त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करायला लावले. नगरचे पोलिस आता शिवसैनिक झाले आहेत. शिवसेनेने पोलिसांमार्फत नगरसेवक कैलास गिरवले (मामा) यांची हत्या केली, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला. 


गिरवले यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर मुंडे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले उपस्थित होते. केडगाव दुहेरी हत्याकांड, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड, तसेच पोलिसांच्या मारहाणीत नगरसेवक गिरवले यांचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर मुंडे बुधवारी नगरला आले होते. त्यांनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांचीही भेट घेतली. गिरवले यांच्या मृत्यूस जबाबदार असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, तसेच राष्ट्रवादीचे आमदार जगताप व कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी त्यांनी शर्मा यांच्याकडे केली. 


त्यानंतर सायंकाळी मंुडे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केडगाव हत्याकांडाचा आम्ही निषेध करतो. ही दुर्दैवी घटना असून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. तथापि, पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करू नयेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांचा घटनेशी काहीही संबंध नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे पटण्यासारखे नाही. शिवसेनेने राजकीय स्वार्थापोटी केडगाव हत्याकांडाचे भांडवल केले. सत्तेचा गैरवापर करत जगताप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. गृहराज्यमंत्री नगरमध्ये येऊन बसतात, पोलिसांवर दबाव टाकतात. पोलिसही खुशाल खोटे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे नगरचे पोलिस शिवसैनिक झाले असल्याचे चित्र असल्याचे मुंडे यांनी सांगितले. 


मामांना जीव जाईपर्यंत मारले 
पोलिसांनी मामांना जीव जाईपर्यंत मारले. अशी कोणती माहिती मामांकडून पोलिसांना हवी होती, असा सवाल मुंडे यांनी केला. मामांची हत्या करण्यासाठी केवळ पोलिसच नाहीत, तर ससून रुग्णालयाचादेखील वापर करण्यात आला. ससून रुग्णालयात मामांवर एक दिवस कोणतेच उपचार करण्यात आले नाहीत. पोलिसांनी कोठडीत घेताना त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. त्यामुळे त्यांच्या हत्येला जबाबदार सर्व संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. 


मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी घेराव 
शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना मारले, शिवीगाळ केली, पत्रकारांनाही मारले. गुन्हे दाखल असूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. गृहराज्यमंत्र्यांसमोर सर्व आरोपी सारखेच असतात. शिवसेना वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा देते. त्यांच्यासमोर सिंह असलेले भाजपचे नेते नांगी टाकत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मदतीमुळेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळलेला नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी घेराव घालणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.  

बातम्या आणखी आहेत...