आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाही; सभापती नागवडेंनी घेतला नाहाटांचा खरपूस समाचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब नाहाटा आणि अनुराधा नागवडे - Divya Marathi
बाळासाहेब नाहाटा आणि अनुराधा नागवडे

श्रीगोंदे- आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाहीत. त्यामुळे आमच्या कुटुंबावर विचार करून टीका करा. आपली स्वतःची नीतिमत्ता तपासून पहा, अशा शब्दांत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचा समाचार घेतला. आढळगाव येथील खासगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नाहाटा हे कार्यक्रम संपण्याअगोदरच काढता पाय घेत निघून गेले होते. 


या कार्यक्रमास नागवडे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र म्हस्के, अनिल ठवाळ आदी उपस्थित होते. नाहाटा यांनी सुरुवातीला चिमटा काढत आम्ही ज्यांना राजकारणात मदत केली, त्यांनीच आमच्यासाठी खड्डे खोदण्याचे काम केले. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जवळच्यांनी घात केला, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे नागवडे कुटुंबावर टीका केली. भाषण संपताच ते निघून गेले. ही टीका नागवडे यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी त्याच ठिकाणी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आम्ही राजकारण धंदा म्हणून करत नाही. नागवडे कुटुंबाने कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही. आम्ही जे करतो, ते कार्यकर्त्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून करतो. स्वहिताचा कधीच विचार केला नाही. पण आपल्या तालुक्यात काहींनी राजकारणाचे पूर्ण वाटोळे करून टाकले आहे. राजकारणाचा त्यांनी धंदा केला आहे. अशा प्रवृत्ती जनता ओळखून आहे. त्यामुळे यापुढे नागवडे कुटुंबावर आरोप करताना भान ठेवावे. योग्यवेळी अशा प्रवृत्तींना उत्तर दिले जाईल, असे नागवडे म्हणाल्या. 


नागवडे यांचा आक्रमक पवित्रा पाहून सर्वच नेत्यांच्या भुवया उंचवल्या होत्या. उपस्थितांत त्यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे राजकीय भांडण विखे, जगताप यांच्या मुळावर व पाचपुते यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा आहे. 


पाचपुतेंना मदत 
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नाहाटा यांची उमेदवारी नागवडेंनी कापली. आढळगाव पं. स. गणात नाहाटांची पत्नी मनीषा यांचा पराभव नागवडेंच्याच कार्यकर्त्यांनी केला. हा राग मनात असल्याने नाहाटा यांनी नागवडे यांच्यावर टीका केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जगताप व नागवडे एकत्र आले, तरी बाळासाहेब नाहाटा मात्र नागवडे यांच्यामुळे जगताप, विखे यांच्यापासून दुरावून पाचपुते यांना मिळू शकतात, अशी चर्चा नाहाटा समर्थक करत आहेत. 


गरिबांना मदत 
बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी तालुक्यातील गोरगरिबांना घरे बांधून दिली, अनेकांच्या मुला-मुलींच्या लग्नात आर्थिक मदत केली. विविध शाळा, मंदिरांना मदत केली. नाहाटा यांनी कधीच शाळेत कामाला लावण्यासाठी कुणाकडून पैसे घेतले नाहीत. स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कधी वर्गणी गोळा केली नाही, अशी प्रतिक्रिया श्रीगोंदे देखरेख संघाचे संचालक व नाहाटा समर्थक बाबासाहेब कुदांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...