आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनी निर्भयपणे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईत सहभागी व्हावे : अण्णा हजारे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगायचा असेल, तर तरुणांनी निर्भयपणे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईत, व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या चळवळीत सहभागी व्हावे. युवा शक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 


पारनेर महाविद्यालयात हजारे यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या, व्यवस्था परिवर्तनाच्या नव्या चळवळीचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, राळेगणसिध्दीचे उपसरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, दत्ता आवारी, दादा पठारे, रामदास घावटे, शरद पवळे, पत्रकार मार्तंड बुचुडे, विनोद गोळे, उदय शेरकर, सनी सोनावळे, तुषार औटी, बबन कवाद, अनिल नांगरे, मच्छिंद्र उचाळे, धीरज महांडुळे, रामदास कवडे आदी उपस्थित होते. 


हजारे म्हणाले, सामान्य जनतेला अडवणूक सहन करावी लागत आहे. भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे उलटली. मात्र, देशातील जनतेला स्वातंत्र्याचा खरा आनंद उपभोगता येत नाही ही शोकांतिका आहे. देशातील ही परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी पुढे येणे अावश्यक आहे. तरुणांनी आपापल्या गावात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे संघटन उभारल्यास तालुक्यातील संघटित कार्यकर्त्यांना राळेगणसिध्दी येथे आंदोलनाचे प्रशिक्षण दिले जाईल. या संघटित कार्यकर्त्यांनी गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर एखादा प्रश्न हाती घेतल्यावर प्रशासनाला, सत्ताधाऱ्यांना दखल घ्यावीच लागेल. प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला. 


भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात सक्रिय कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्यासाठी स्वच्छ चारित्र्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. तसेच कोणत्याही पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार नाही, अशी हमी प्रतिज्ञा पत्राद्वारे द्यावी लागणार आहे. मात्र, कार्यकर्त्याला अपक्ष निवडणूक लढवता येईल, असे हजारे यांनी स्पष्ट केले. झावरे म्हणाले, अण्णांनी राजकीय पक्षांविरोधात भूमिका घेतली असली, तरी तालुक्यातील सर्वच पुढारी सर्व प्रथम अण्णांचे सेवक, कार्यकर्ते आहेत. आमच्यासाठी राजकीय भूमिका दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर आहे. आम्ही अण्णांच्या आंदोलनात नेहमीच सहभागी होत आहोत व यापुढेही आंदोलनात अग्रभागी राहू. 


सध्याची निवडणूक पध्दत चुकीची 
सध्याची पक्षीय निवडणूक पध्दत घटनाबाह्य आहे. घटनेतील कलम ८४ परिच्छेद ख आणि ग नुसार भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. राजकीय पक्षांमार्फत निवडणूक लढवण्याबाबत घटनेत तरतूद नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली निवडणूक पध्दत चुकीची असल्याचे हजारे म्हणाले. ही पध्दत बदलावी, निवडणूक लढवण्यासाठी राजकीय पक्षांना बंदी घालावी, मतदान यंत्रावरील निवडणूक चिन्ह हटवून त्या ऐवजी स्वतंत्र (अपक्ष) रितीने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे छायाचित्र असावे.यासाठी आपण गेल्या सहा वर्षांपासून निवडणूक आयोगाशी संघर्ष करीत असल्याचे हजारे यांनी सांगीतले. 

बातम्या आणखी आहेत...