नगर- पाेलिसांवरआक्षेप नोंदवत न्यायालयात धाव घेऊन २० लाख रुपयांची दाद मागणे एकाला अंगलट आले. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यानेच पोलिसांशी असभ्य बेशिस्त वर्तन केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याने नगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात हजार रुपयांची रक्कम भरावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जून २०११ मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल सचिन भिवसेन शिंदे (औरंगाबाद) याने ही याचिका दाखल केली होती.
सचिन शिंदे १७ जून २०११ रोजी त्याच्या बुलेटवरुन नगरच्या पोलिस अधीक्षक चौकातून जात होता. बुलेटला नंबरप्लेट नसल्यामुळे ड्युटीवरच्या पोलिसांनी त्याला थांबवून नियमानुसार दंडाची पावती फाडावी लागेल, असे सांगितले. पण शिंदे याने पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्याला अटक करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यांनी शिंदेला ३०० रुपये दंड ठोठावला. मोटारसायकलला नंबरप्लेट नसल्यामुळे पोलिसांनी २०० रुपये दंड केला होता.
नंतर शिंदेने पोलिसांनी आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करुन मारहाण करुन डांबून ठेवले, असा आरोप करत पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवावा, आपल्याला २० लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सखोल चौकशी करुन न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याबाबत औरंगाबादच्या खंडपीठाने समाधान व्यक्त केले.
कायदा सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून बेशिस्त वर्तन केल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.