आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadami Party News In Marathi, Lok Sabha Election Cadidature, Nagar

‘आम’ उमेदवारांना हवेत प्रत्येकी 40 लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिल्ली विधानसभेत सत्ता मिळवत सर्वांनाच आपली दखल घेण्यास भाग पाडलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नवख्या ‘आम आदमी पार्टी’ने लोकसभा निवडणुकीत देशभरात एकूण 268 उमेदवार उभे केले आहेत. स्वत:ला ‘आम’ म्हणवणार्‍या या पक्षाने आता उमेदवारांच्या निवडणूक खर्चासाठी जनतेकडे प्रत्येक उमेदवारामागे 40 लाख रुपयांच्या देणगीची अपेक्षा धरली आहे. याचा हिशेबही पारदर्शकपणे जाहीर केला आहे. ‘आम आदमी’चा हा निर्णय सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.


‘आम आदमी’ने नगर जिल्ह्यातून दोन उमेदवार लोकसभेच्या रणांगणात उतरवले आहेत. नगर मतदारसंघातून अभिनेत्री दीपाली सय्यद व शिर्डी मतदारसंघातून माजी राजपत्रित अधिकारी नितीन उदमले यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या दोघांच्या निवडणूक खर्चासाठी या पक्षाने जनतेकडून देणग्यांची अपेक्षा धरली आहे. अर्थात देणगी देण्याबाबत कोणावरही सक्ती केली नसली, तरी उमेदवार यादीतील काही नावे पाहता त्यांना खरेच देणग्यांची गरज आहे का, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.


‘आम आदमी पक्षा’च्या my.aamaadmiparty.org या अधिकृत संकेतस्थळावर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी आहे. पक्षाने आतापर्यंत देशभरात एकूण 268 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहेत. या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येकी 40 लाख रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. यापैकी काही उमेदवारांना देशातील व परदेशांतील नागरिकांकडून देणग्या मिळाल्यासुद्धा आहेत. उमेदवारांना किती जणांकडून व एकूण किती रकमेच्या देणग्या कधी व कशा मिळाल्या, याचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
अगदी 1 रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंतच्या देणग्यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. नगरच्या उमेदवार दीपाली सय्यद व शिर्डीचे उमेदवार नितीन उदमले यांना अद्याप एक रुपयाही देणगीदाखल मिळालेला नाही. केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी कुमार विश्वास यांना सर्वाधिक 2 लाख 39 हजार 280 रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, असा तपशील संकेतस्थळावर आहे. जाहीरपणे देणग्या मागणारा, देणग्यांचा तपशील पारदर्शकपणे जाहीर करणारा पक्ष म्हणून ‘आम आदमी पक्ष’ सध्या चर्चेत आहे. इतर पक्षांनीही आपली भूमिका मांडावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.


‘आप’ने पारदर्शकता जपली
‘आम आदमी’ने निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराचा ठरावीक खर्च अपेक्षित धरला आहे. उमेदवारी देताना कोणालाही पैसे मागितलेले नाहीत. काही उमेदवारांची तर खर्च करण्याचीही ऐपत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून देणग्या स्वीकारणे काही गैर नाही. शिवाय देणगी देणे पूर्णपणे ऐच्छिक बाब आहे. त्यासाठी कोणावरही सक्ती करण्यात आलेली नाही. सर्व देणगीदारांचा, मिळालेल्या रकमेचा तपशीलही स्पष्ट केलेला आहे. कदाचित अशी पारदर्शकता दर्शवणारा ‘आम आदमी’ हा एकमेव पक्ष असावा.’’ नितीन उदमले, उमेदवार, शिर्डी मतदारसंघ.

इतरांनीही पारदर्शकता दाखवावी
‘आम आदमी’ने संकेतस्थळावर मिळालेल्या देणग्यांची माहिती पारदर्शकपणे दिली, ही सकारात्मक बाब आहे. या पक्षाने किमान काहीतरी का होईना, पारदर्शकता बाळगली आहे. निदान तसे दर्शवले आहे, परंतु इतर पक्षांचे काय? तसेच पक्र्षांतर्गत खर्चाबाबतही कोणीच बोलताना दिसत नाही. उमेदवारांच्या प्रचारसभांचे चित्रीकरण करुन त्याच्या खर्चाचे ऑडिट केले, तर आपोआप खर्चाचा तपशील लक्षात येईल. आता ‘आप’ने सुरुवात केली आहे, तर इतर पक्षांनीही अशी पारदर्शकता दाखवावी.’’ अँड. श्याम आसावा, सामाजिक कार्यकर्ते.


अशा आहेत देणग्या
उमेदवार मतदारसंघ देणग्या रक्कम
गुल पनाग चंदिगड (चंदिगड) 1 251
पत्रकार आशुतोश चांदणी चौक (दिल्ली) 2 202
जेठाभाई पटेल सुरेंद्रनगर (गुजरात) एकही नाही
सुरेश खोपडे बारामती (महाराष्ट्र) एकही नाही
नंदू माधव बीड (महाराष्ट्र) एकही नाही
मेधा पाटकर पश्चिम मुंबई (महाराष्ट्र) 7 13,700
अंजली दमानिया नागपूर (महाराष्ट्र) 1 251
कुमार विश्वास अमेठी (उत्तर प्रदेश) 32 2,39,280