आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेच्या दोन्ही जागा आम आदमी लढवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आम आदमी पक्ष नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. चारित्र्य तपासूनच योग्य व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती पक्षाचे जिल्हा समन्वयक किरण उपकारे यांनी शुक्रवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे लोकसभा निवडणुकीकडे. नगर जिल्ह्यात सध्या भाजप व शिवसेनेचे खासदार आहेत. यातील एक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यंदा नरेंद्र मोदी यांची लाट येईल, असे भाजपचे म्हणणे आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने अभुतपूर्व यश मिळवल्याने या पक्षाकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नगर जिल्ह्यातून ‘आप’ आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जिल्हाभरात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नगर येथील कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन शिवाजी पुतळ्यासमोर स्वच्छता केली. कार्यकर्त्यांनी ‘भारतमाता की जय.’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी राजू आघाव, उमेश क्षीरसागर, रोहिदास वाबळे, डॉ. किसन रजपूत, भाऊसाहेब बेलेकर, प्राची मखरे, हर्षदा मगर आदी उपस्थित होते.
उपकारे म्हणाले, पक्षाकडे तरुणवर्गासह सामान्य माणसांचा ओघ वाढला आहे. दिल्लीत मिळालेल्या यशानंतर आता आम्ही लोकसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा लढवण्याच्या तयारीत पक्ष आहे. पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीतही सामान्य माणूस हाच पक्षाचा उमेदवार असेल. उमेदवार निश्चित करताना त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, तसेच चारित्र्य तपासण्यात येईल. कोणता उमेदवार द्यायचा हे आम्ही जनतेला विचारू. त्यासाठी तालुका, शहरनिहाय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. आप पक्ष थेट लोकसभेच्याच रिंगणात उतरणार असल्याने इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी धसका घेतला असल्याचे काही पदाधिकार्‍यांनी खासगीत बोलताना सांगितले.
जिल्ह्यात 20 हजार सभासदांची नोंदणी
आम आदमी पक्षाने दिल्लीत मोठे यश मिळवल्यानंतर पक्षाच्या सभासदांची संख्या वेगाने वाढते आहे. दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात 18 हजार सभासदांची नोंदणी झाली होती. आता हा आकडा वीस हजारांपर्यंत पोहोचला असल्याचे पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनी सांगितले.