आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान आज नगरमध्ये

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अन्यायग्रस्त महिलांसाठी स्नेहालय संस्थेत उभारण्यात आलेल्या ‘सत्यमेव जयते भवना’चे लोकार्पण शनिवारी (26 जानेवारी) अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते होणार आहे. लाभार्थी व निमंत्रितांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम एमआयडीसीतील पुनर्वसन संकुलात होईल.

स्त्री भ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, निराधार बालकांचे प्रश्न याबाबत स्नेहालय करीत असलेल्या कामावर आधारित ‘सत्यमेव जयते’ ही मालिका आमिर खानने मागील वर्षी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सादर केली. या मालिकेमुळे संपूर्ण देशात मोठय़ा प्रमाणात जागृती झाली. या मालिकेच्या पहिल्या भागात स्नेहालयला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. देश-परदेशांतून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. या मदतीतून स्नेहालयने समस्याग्रस्त महिला, कुमारी माता, बलात्कारीत महिला व मुलींच्या पुनर्वसनासाठी सुसज्ज असे ‘सत्यमेव जयते भवन’ उभारले. सुमारे 20 हजार चौरस फुटांच्या या संकुलात दोनशे महिलांसाठी निवास व्यवस्था, रोजगार प्रशिक्षण केंद्र, भोजनालय व समुपदेशन केंद्र आदी सुविधा आहेत. आमिर खानच्या हस्ते शनिवारी या संकुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असे स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी व कार्याध्यक्ष संजय गुगळे यांनी सांगितले.

सत्यमेव जयते भवनाचे व्यवस्थापन स्नेहालयच्या ‘स्नेहाधार’ या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्याग्रस्त महिला व मुलींसाठी 9011363600, 9011026495 व 9011026485 या मोबाइल क्रमांकांवर हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. अमृत महाजन व विश्वनाथ गुंडाळे यांनी लिहिलेल्या ‘अंधाराशी दोन हात’ या पुस्तकाचे प्रकाशन आमिर खानच्या हस्ते यावेळी करण्यात येईल. मागील 20 वर्षे स्नेहालयने बालके व महिलांच्या बाजारू लैंगिक शोषणाविरुद्ध दिलेल्या लढय़ाचा इतिहास या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे.

अनोखे स्मारक - प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तयार केलेले स्वामी विवेकानंद, राष्ट्रपिता महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, राजगुरू आदींचे पुतळे, तसेच दिल्लीसह देशभरात बलात्काराच्या घटनेत शहीद झालेल्या माता-भगिनींचे अनोखे स्मारक स्नेहालयात उभारण्यात आले आहे. नव्या रूपातील स्नेहालय 27 जानेवारीला सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.