आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवणी खाद्यपदार्थांची धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सावेडीतील चावडी आनंद यात्रेला नगरकरांचा प्रतिसाद वाढतो आहे. प्रदर्शनात गाव साकारण्यात आले असून त्यात बारा बलुतेदारांबरोबर विविध वस्तू मांडण्यात आल्या आहेत. मालवणी पद्धतीचा सागरी मेवा तसेच शाकाहारींसाठीच्या शिपी आमटीला चांगली मागणी आहे.

बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी चावडी संस्थेमार्फत आनंद यात्रेचे आयोजन केले जाते. जॉगिंग पार्कसमोरील संत निरंकारी भवन मैदानावर भरलेल्या आनंद यात्रेत प्रवेश केला की, डाव्या बाजूला खेडेगावाचा देखावा दिसतो. त्यात ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा तसेच बारा बलुतेदारांचे स्टॉल आहेत. लहान मुलांना फेरी मारण्यासाठी बैलगाडी उपलब्ध आहे. त्यामुळे खेड्यात गेल्याचा भास होतो. आयुर्वेदिक औषधे, आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ प्रदर्शनात आहेत. सांगली येथील शाहजहान नदाफ यांनी लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्या लक्ष वेधून घेतात. लोकोपयोगी पारंपरिक साहित्याबरोबरच आधुनिक काळातील इन्व्हर्टर, सोलर वॉटर हिटर, गांडूळ खत व शेणखतावर पिकवलेले धान्य, मसाले, लोणची आदींची प्रदर्शनात रेलचेल आहे.

प्रदर्शनात भटकंती करून थकल्यानंतर खवय्यांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. कर्जतची शिपी आमटी, थालीपीठ, वांग्याचे भरीत, सोबतीला बाजरीची भाकरी व मालवणी पदार्थांचा घमघमाट तोंडाला पाणी आणतो. मालवणी पदार्थांमध्ये सुरमई, पापलेट, मांदेली, कोळंबी फ्राय, कोंबडी वडे, आंबेली उसळ, तसेच सोलकढीचा समावेश आहे. मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उखाणे स्पर्धा, पोवाडा, शिवरायांवरील एकपात्री नाट्यप्रयोग यांना चांगला प्रतिसाद मिळाला.