आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aarti's Mother Gumphabai Speaking With Divya Marathi Team

..तर आरतीची करिअरची गाडी चुकली असती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जून 2012 मध्ये आरतीची निवड भोपाळ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विशेष प्रशिक्षणासाठी झाली, पण तिला पाठवण्यासाठी माझ्याकडे शंभर रुपयेही नव्हते. त्यावेळी माझा भाऊ उमेश हरण्या काळे व शकिल शेख सर यांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे आरती भोपाळला जाऊ शकली. भावाने मदत केली नसती, तर आरतीची करिअर गाडी कायमची चुकली असती..

विशाखापट्टणम येथील भारतीय कँपमध्ये दोन वर्षे प्रशिक्षण पूर्ण करून आरती नुकतीच नगरला आली. गुणवंत पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आले. यावेळी तिची आई गुंफाबाई उपस्थित होत्या. ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी भावाच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आरतीला घडवण्यात आलेल्या अडचणींची कथा सांगितली.

गुंफाबाई यांना सुयोग, आरती, सूरज व सुजित अशी चार मुले. मुले झाल्यानंतर पतीने त्यांना टाकून दिले. ‘‘मी माहेरी भावांसमवेत राहते. शेतात मजुरी करून चार मुलांना शिक्षण देण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे सांगून गुंफाबाई म्हणाल्या, भोपाळच्या ट्रेनिंग कँपसाठी आरतीची निवड झाल्यानंतर पहिल्यांदा मी तिला पाठवण्यास विरोध केला. तेव्हा उमेशने मला आश्वासन दिले की, माझी मुलगी मी तुला देतो, पण आरतीला भोपाळला जाऊ दे. मग हृदयावर दगड ठेवून आरतीला भोपाळला पाठवले. आरतीला लहानपणापासूनच खेळाची आवड. खेळाव्यतिरिक्त तिला गुरेढोरे वळणे, घरातील कामे अशा कोणत्याही बाबीकडे तिने लक्ष दिले नाही. मला असे जगायचे नाही, अशी तिची जिद्द होती. त्यावेळी भाऊ उमेश व शकिल शेख सर देवासारखे उभे राहिले. त्यांनी जर मदत केली नसती, तर आरतीला देशपातळीवर नाव कमवता आले नसते. आतापण घरातील परिस्थिती पहिल्यासारखीच आहे. त्यात काही बदल झालेला नाही. आरतीचे करिअर घडवण्यात ज्यांचे ज्यांचे सहकार्य मिळाले त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

आरती सध्या रुईछत्तीशीच्या जनता महाविद्यालयात बारावी सायन्समध्ये आहे. पेमराज सारडा महाविद्यालय आरतीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. विशाखापट्टणम येथे होणार्‍या निवड चाचणीसाठी तत्काळ पोहोचण्याकरता हिंद सेवा मंडळाने तिला विमानाचे तिकिट दिले, असे गुंफाबाई म्हणाल्या.

माझी मुलगी जग जिंकू शकते..
स्त्री भ्रूणहत्या करणार्‍यांना मला सांगायचे आहे, की मुलीला जन्माआधीच मारू नका. तिला जन्माला येऊ द्या. जन्माला आली, तर ती जग जिंकू शक ते, हे माझ्या मुलीने दाखवून दिले आहे. तुम्हीही मुलीला वाव द्या. पहा, ती तुमचे नाव कसे उंचीवर नेऊन ठेवते ते..! गुंफाबाई भोसले, आरतीची आई.