आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळमकरांवर महापौरपदाचा "अभिषेक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- घोडेबाजारासह अनेक नाट्यमय घडमोडीनंतर महापौरपदावर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे अभिषेक कळमकर यांची वर्णी लागली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी झालेल्या निवडणुकीत कळमकर यांना ३२, तर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सचिन जाधव यांना २९ मते मिळाली. युतीने दिलेल्या आव्हानामुळे हा विजय मिळवताना आघाडीच्या चांगलेच नाकीनव आले. मनसे नगरसेवकांनी पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडत आघाडीला तारले. त्यामुळे आघाडीची अवस्था जिंकूनही हरल्यासारखीच आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढचा महापौर कोण यावर सोमवारी पडदा पडला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळत महापौरपद कायम ठेवले. शिवसेना-भाजपने दिलेल्या जोरदार लढतीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. दीड वर्षापूर्वी महापालिकेत सत्ता स्थापन करताना ४० पेक्षा अधिक संख्याबळ जमवणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी मात्र अवघ्या ३२ मतांवर निसटता विजय मिळवावा लागला. सेना- भाजपने सुरूवातीपासून एकजूट दाखवत राष्ट्रवादी, काँग्रेस अपक्ष नगरसेवकांना फोडण्यात यश मिळवले.
बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काँग्रेसचे संजय लोंढे मुदस्सर शेख युतीच्या गळाला लागले. त्यामुळे हे तिघेही महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बोलावलेल्या सभेला गैरहजर होते. बाेराटे लोंढे यांनी रजेचे अर्ज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे सादर केले. शेख यांनी मात्र रजेचा अर्ज देताच सभेला दांडी मारली. अपक्ष नगरसेविका उषा ठाणगे सारिका भुतकर यांनी उघडपणे युतीच्या गटात सामील होत जाधव यांना मतदान केले. शिवाय आघाडीच्या तीन नगरसेवकांचे पद ऐनवेळी रद्द करण्यातही युतीला यश मिळाले.
नगरसेवक अजिंक्य बोरकर, नगरसेविका ख्वाजाबी कुरेशी अनिता भोसले यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र खोटे असल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आल्याचे पीठासीन अधिकारी कवडे यांनी सभेत जाहीर केले. त्यामुळे आघाडीच्या नगरसेवकांमध्ये काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, मनसेचे नगरसेवक बरोबर असल्याने आघाडीला ३२ चा आकडा गाठत निसटता विजय आला.
तीन नगरसेवक अपात्र, तीन गैरहजर दोन अपक्ष युतीच्या गटात सामील झाल्याने विजय मिळवताना आघाडीच्या नाकीनव आले. मनसे नगरसेवकांनी नेहमीप्रमाणे पक्षनिष्ठा वाऱ्यावर आघाडीला साथ दिलीय त्यामुळे विजयाच्या जवळ पोहचलेल्या युतीला हार पत्करावी लागली. महापौरपदाच्या आतापर्यंतच्या निवडणुकांप्रमाणेच यावेळीही घोडेबाजाराची परंपरा कायम राहिली. या घोडेबाजारात अनेक नगरसेवक लखपती झाले. नगरकरांनी या निवडणुकीकडे केवळ नगरसेवकांची "दिवाळी' म्हणूनच पाहिले. नवीन महापौर वेगळ काय करणार, हे नगरकरांना माहीत आहे. त्यामुळे कळमकरांचा "अभिषेक' फळास येईल का? हा प्रश्नच आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नगरकरांनो, शहाणे व्हा...