आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेंडीजवळ संतप्त जमावाने पेटवला ट्रक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मालट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील बहीण-भाऊ ठार झाले. हा अपघात अौरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात शुक्रवारी सकाळी साडेअकराला झाला. ठार झालेले दोघेही शेंडीतील रहिवासी असल्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांसमोरच पेट्रोल टाकून ट्रकला आग लावली. या घटनेमुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
विक्रम एकनाथ कराळे जनाबाई पांडुरंग कार्ले अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बजाज प्लॅटिनावरून (एमएच १६ एसी ७५३३) शेंडीकडे येत होते. औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकची (आरजे २१ जीबी ३६८) त्यांना जोराची धडक बसली. अपघातात जनाबाई जागीच ठार झाल्या. काही प्रत्यक्षदर्शींनी जखमी विक्रम यांना तत्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, त्यांचाही मृत्यू झाला.

अपघातानंतर मालट्रकचालक वाहन तेेथेच सोडून पसार झाला. या अपघाताची माहिती समजताच मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला. जमावाने रास्ता राेको आंदोलन करत वाहतूक थांबवली. तोपर्यंत काही पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने काही दुचाकींमधून पेट्रोल काढून ट्रकवर शिंपडले आग लावली. ट्रकने क्षणार्धात पेट घेतला. त्यामुळे वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती.

भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, तोफखान्याचे निरीक्षक राजेंद्र निकाळजे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अजित लकडे आदी अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी ट्रकला लागलेली आग शमवली. या घटनेची माहिती मिळताच आमदार शिवाजी कर्डिले हेही तेथे आले. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तेथे आलेल्या तहसीलदार सुरेश पाटील यांनी बायपास चौकात सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याचे निवेदन देण्यात आले. बायपास चौकात सिग्नल बसवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोखर्डीच्या सरपंच अरुणा जावळे, उपसरपंच रामेश्वर निमसे, शेंडीचे सरपंच भगत, उपसरपंच सुनील शिंदे, संदीप कर्डिले आदी उपस्थित होते.

या घटनेमुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मोठा फौजफाटा आल्यानंतर पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. विक्रम कराळे जनाबाई कार्ले यांच्यावर सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांचे अपुरे बळ
अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांसह पाचशे ते हजार जणांचा जमाव जमला. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या अपुऱ्या पोलिस बळाने अयशस्वी प्रयत्न केला. मूठभर पोलिसांच्या ते अावाक्याबाहेर होते. पोलिसांसमोर जमावाने जवळच उभ्या असलेल्या मोटारसायकलीतून पेट्रोल काढून ट्रक पेटवून दिला. त्याचवेळी जर पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचली असती, तर महामार्ग तासभर ठप्प झाला नसता, तसेच ट्रक पेटवला गेला नसता.

क्लीनरने घेतले कोंडून
अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. मात्र, क्लीनर ट्रकच्या केबिनमध्येच होता. अपघातानंतर गोळा झालेला संतप्त जमाव पाहून क्लीनरने घाबरुन स्वत:ला केबिनमध्ये कोंडून घेतले. जमावाला उशिरापर्यंत क्लीनर आत असल्याचे माहिती नव्हते. काहीजणांनी डोकावून पाहिल्यानंतर त्यांना आतमध्ये क्लीनर दिसला. त्यांनी काचा फोडून त्याला बाहेर काढले. त्याची धुलाई करण्यापूर्वीच पोलिस तेथे दाखल झाल्यामुळे तो बचावला.
बातम्या आणखी आहेत...