आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भरधाव वेगात चुकीच्या दिशेने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणारा दुचाकीस्वार ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. ही घटना नगर-मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव येथील पुलाजवळ सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या चार दिवसांत हा पाचवा अपघात झाला असून त्यात दहावा बळी गेला आहे.
दुचाकीस्वार सदाप्पा बसाप्पा चिनागुडे (52, रा. बोल्हेगाव, नगर) हा अपघातात जागीच ठार झाला. एमआयडीसी येथे माल उतरवून ट्रक (एमएच 16 बी 2170) रेल्वे स्टेशनकडील मालधक्क्याकडे जात होता. याचवेळी एका जोडरस्त्याने महामार्गावर येऊन वेगात पुढे जाणार्‍या ट्रकला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दुचाकीवर स्वार असलेल्या चिनागुडे यांनी केला. परंतु, ओव्हरटेक केल्यानंतर ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने चिनागुडे हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी हजर झाले.
ट्रकचालक भरत माणिक भोसले (रा. केडगाव) याच्याविरुद्ध अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी टिळक रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलगी आदिती पुंड हिचा करुण अंत झाला. दुसर्‍या अपघातात सह्याद्री चौकात ट्रकच्या धडकेत तिघे जण ठार झाले. तिसरा अपघात कल्याण रस्त्यावर शिवाजीनगर येथे झाला. या अपघातातही दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. चौथा अपघात नगर - औरंगाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी झाला. यामध्ये ट्रकच्या धडकेत तिघे जण ठार झाले. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर होणार्‍या अपघातांचे व त्यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच आहे.