आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबट पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला जिवेमारण्याचा प्रयत्न( अवघ्या दोन तासांमध्ये आरोपीला केले जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पेट्रोलपंपावर डिझेल भरल्यानंतर पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्याला दादागिरी करत त्याच्या अंगावर वाहन घालून जिवेमारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार सर्जेपुरा परिसरातील अँबट पेट्रोलपंपावर शनविारी (२३ ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. तोफखाना पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत पसार झालेल्या आरोपीला गजाआड केले.
नितीन चंद्रकांत शेलार (३५, भिंगारदिवे मळा, सदि्धार्थनगर) असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. त्याचा बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय आहे. नितीन शेलार व त्याचा मित्र शेवरोलेट एन्जॉय कारमधून (एमएच १६ एटी ५६३२) सायंकाळी सहाच्या सुमारास अँबट पेट्रोलपंपावर आले. तेथे त्यांनी कारमध्ये एक हजार रुपयांचे डिझेल भरले. पंपावरील कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली, तेव्हा शेलारने दादागिरी केली. "तू मला ओळखत नाहीस का‌? तू कोणाला पैसे मागतोस माहिती आहे का? तुला नगरमध्ये राहायचे की नाही?' असे धमकावत शेलारने कार सुरू केली. कर्मचाऱ्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता शेलारने कार त्याच्या अंगावर घातली. त्यामुळे कर्मचाऱ्याला धक्का बसून तो कारच्या बोनेटवर पडला. शेलार तशीच कार पुढे दामटवत कर्मचाऱ्याला काही अंतरापर्यंत घेऊन गेला. नंतर कर्मचारी बोनेटवरून खाली पडून जखमी झाला.

पेट्रोलपंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी शेलारच्या कारचा पाठलाग केला. परंतु शेलार पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना कळवली. पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनाही हा प्रकार समजला. त्यांनीही तोफखान्याच्या पोलिस निरीक्षकांना आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी शेलारला ओळखले होते. त्यामुळे शेलारला पकडण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली. रात्री दहा वाजता त्याला अटक केली.

हॉटेलात आवळल्या मुसक्या
शेलारचे नाव निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पोलिस अधीक्षक लखमी गौतम हेही तपासाचा 'फॉलोअप' घेत होते. पोलिस निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चिटमपल्ले, कॉन्स्टेबल राजू वाघ, दिगंबर शेलार, ए. एस. शेख, एस. के. पवार यांच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. सावेडी परिसरातील एका हॉटेलात या पथकाने शेलारच्या मुसक्या आवळल्या. शेलारला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसी खाक्या पाहताच शरण
पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला जिवेमारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी नितीन शेलार हा भरधाव वेगाने पसार झाला. त्याने एका गल्लीत शेवरोलेट एन्जॉय कार उभी केली. नंतर मित्रासह सावेडीतील एका हॉटेलात जाऊन चहा पीत बसला. ताेपर्यंत पोलिसांनी त्याचा माग काढला. पकडण्यासाठी आलेल्या पोलिसालाही त्याने घडलेल्या प्रकाराची सिनेस्टाइल हकीकत कथन केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो शरण आला. लपवून ठेवलेली कारही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केली.