आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उतारवयात ‘त्यांच्या’वर पुन्हा कोसळले आभाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तेरा वर्षांपूर्वी (2001) धाकटा मुलगा कारगिलच्या युद्धात शर्थीने लढत असताना मातृभूमीसाठी शहीद झाला, अन् गुरुवारी (29 मे) मोठा मुलगा सून, नातीसह अपघाताने दुरावला. आयुष्याचे आधार असलेल्या दोन धडधाकट मुलांचे मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य त्यांच्या वाट्याला आले. उतारवयात ज्याने त्यांचा सांभाळ करायचा, त्या शाळकरी नातवालाच सांभाळण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आली आहे. नगर तालुक्यातील मदडगाव येथील गोविंद व जनाबाई शेडाळे या वृद्ध दाम्पत्यासोबत नियतीने खेळलेल्या हृदयद्रावक अन् क्रूर खेळामुळे शुक्रवारी संपूर्ण गाव शोकमग्न होऊन रडत होते.

औरंगाबादहून गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास नगरकडे जाणा-या भरधाव मारुती कारचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणा-या कंटेनरवर धडकली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विष्णू गोविंद शेडाळे (चालक, 45), अलका विष्णू शेडाळे (40) आणि त्यांची मुलगी विशाखा (18, हल्ली पवननगर, सावेडी, नगर) हे तिघे या अपघातात मृत्युमुखी पडले. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर मूळ गावी मदडगाव (ता. नगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाखावर उपचार करण्यासाठी हे कुटुंबीय औरंगाबादला गेले होते. सायंकाळी नगरकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.

शेडाळे दाम्पत्य व विशाखाच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच मदडगाववर शोककळा पसरली. शुक्रवारी सकाळपासून गावातील दुकाने व कार्यालये बंद होती. दुपारी एकच्या सुमारास शेडाळे दाम्पत्य व त्यांच्या मुलीचा मृतदेह घेऊन रुग्ण्वाहिका गावात आली. अन् शेडाळे कुटुंबीयांच्या आप्तेष्टांनी, नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी एकच आक्रोश सुरू केला. रणरणत्या उन्हात दुपारी दीड वाजता तिघांनाही एकाच चितेवर अग्निडाग देण्यात आला. हृदय हेलावून टाकणा-या या दृश्याने अंत्यविधीला आलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. शोकाकुल वातावरणात सर्वांनी शेडाळे दाम्पत्याला व विशाखाला अखेरचा निरोप दिला.

मृत विष्णू शेडाळे हे नगर एमआयडीसीतील किर्लोस्कर कंपनीत बेअरिंग विभागात कार्यरत होते. कंपनीतील किर्लोस्कर कामगार सेनेचे ते अध्यक्षही होते. नोकरीमुळे गेल्या 13 वर्षांपासून ते पत्नी व दोन मुलांसह नगरमध्ये (विशाखा बंगला, जाई अपार्टमेंटशेजारी, भिस्तबाग) स्थायिक होते.

मृत विशाखा सारडा महाविद्यालयात नुकतीच अकरावी उत्तीर्ण झाली होती, तर मुलगा वृषभ याने इयत्ता दहावीत (समर्थ विद्या मंदिर) प्रवेश केला आहे. विशाखा थायरॉईड ग्रंथीच्या दुखण्याने आजारी असल्यामुळे तिला घेऊन शेडाळे दाम्पत्य उपचारार्थ औरंगाबादला गेले होते, तर क्लास असल्यामुळे व आजोबा घरी आल्यामुळे वृषभ औरंगाबादला न जाता नगरमध्येच घरी थांबलेला होता.

मदडगावमध्ये शेडाळे यांची आई जनाबाई व वडील गोविंद राहतात. तेथे त्यांची थोडीफार शेती आहे. विष्णू शेडाळे यांचा लहान भाऊ नारायण हा कारगिल युद्धात मातृभूमीसाठी शहीद झालेला आहे. मदडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्याचे पुतळ्याच्या रूपात स्मारकही आहे.

मृत विष्णू शेडाळे यांच्या पाठीमागे दोन विवाहित बहिणीही आहेत. त्यापैकी एक राळेगण म्हसोबाला (ता. नगर), तर दुसरी सारोळा बद्दीला (ता. नगर) राहते. शेडाळे यांच्या अंत्यविधीला किर्लोस्कर कंपनीतील सहकारी, कामगार सेनेचे सदस्य, अधिकारी, नातेवाईक, नगरमधील शेजारी, आप्तेष्टही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णवाहिकाची अमानुषता
मृत विष्णू यांचे चुलतभाऊ नरहरी शेडाळे हे गुरुवारी रात्री औरंगाबादला पोहोचले. शुक्रवारी सकाळी मृतदेह नगरला आणण्यासाठी त्यांनी एक रुग्णवाहिका बोलावली. वाहनचालकाने एक हजार रुपये ‘अ‍ॅडव्हान्स’ घेतला. पण, त्याच्या रुग्णवाहिकेत केवळ एकच मृतदेह ठेवण्याची सोय होती. त्यामुळे नरहरी यांनी त्याला दुसरी रुग्णवाहिका आणण्याची विनंती केली. तेव्हा त्याने असमर्थता तर दर्शवलीच. पण, नरहरी शेडाळे यांच्याकडून घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने नरहरी यांना दुसरी रुग्ण्वाहिका बोलवावी लागली. परंतु, मदडगावला मृतदेह घेऊन येईपर्यंत ती रुग्णवाहिकाही रस्त्यात वाळुंज एमआयडीसी, वडाळा व पांढरीपूल येथे तीन वेळा पंक्चर झाली. तोपर्यंत मदडगावमध्ये त्यांचे आप्तेष्ट डोळ्यांत प्राण आणून वाट पाहात होते.