आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीसीएस’ने जागवल्या पाकवरील विजयाच्या स्मृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; पाकिस्तानने१९६५ च्या एप्रिलमध्ये कुरापत काढून केलेल्या आक्रमणाला चोख अत्यंत उत्तर देत धूळ चारली. त्यामुळे पाकिस्तानच्या युद्धखोरीची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची अक्षरश: दातखीळ बसली. हा विजय मिळवताना अनेक जवान अधिकाऱ्यांनी अतुलनीय शौर्य दाखवत आपल्या प्राणांची आहुती दिली. या जाज्ज्वल्य विजयाच्या स्मृती गुरुवारी नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसीएस) जागवण्यात आल्या. ‘एसीसीएस’च्या युद्धस्मारकावर एसीसीएसचे कमांडट वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांनी पुष्पचक्रे वाहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याच वेळी या सर्व युद्धातील भारतीय जवानांच्या कामगिरीचे अतिशय परिणामकारक शब्दांत चित्र उभे करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले.
या विजयात आर्मर्ड कोअरची भुमिका अतिशय महत्त्वाची असल्याने ‘एसीसीएस’च्या युद्धस्मारक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे युद्धस्मारक म्हणजे १९६५ च्या भारत-पाक युद्धात विशेष कामगिरी केलेला सेंच्युरियन रणगाडा आहे. ही बाब विशेष औचित्याची ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. त्यानंतर सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी जवानांना उपस्थितांना संदेष दिला. त्यानंतर अनुक्रमे ‘एसीसीएस’मधील सर्वांत वरिष्ठ रिसालदार मेजर उदय भान, १९६५ च्या युद्धात सहभागी झालेले निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल आनंद गोरे, मेजर जनरल (निवृत्त) बी. एस. मलिक, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. के. सेवल, तसेच सध्याचे ‘एसीसीएस’चे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी युद्धस्मारकावर पुष्पचक्र वाहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर तीन वेळा ‘भारत माता की जय’च्या घोषांत कार्यक्रमाची सांगता झाली.

अदम्य साहसाचा विजय
आर्मर्डकोअर म्हणजे भारतीय लष्कराचा कणा आहे. रणगाडा हे आर्मर्ड कोअरचे प्रमुख हत्यार. भारत-पाक युद्धात आर्मर्ड कोअरच्या रणगाड्यांनी शत्रुला नामोहरम करण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. त्यावेळी पाकिस्तानकडे पॅटन- एम ४७ एम ४८ हे अमेरिकन बनावटीचे शक्तिशाली रणगाडे होते. त्यांच्याकडे १७ आर्मर्ड रेजिमेंट होत्या.
भारताकडे मात्र फक्त १५ आर्मर्ड रेजिमेंट पॅटनच्या तुलनेत कमी ताकदीचे सेंच्युरियन, स्टुअर्ट शर्मन हे रणगाडे होते. त्यामुळे भारतीय उपखंडात पाकिस्तानचे याबाबतीत पारडे काहीसे जड होते. त्याचा पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना गर्व झाला होता. याच अहंकारातून त्यांनी भारताशी युद्ध सुरू केले. मात्र, भारतीय जवानांनी अतुलनीय साहस, जिद्द देशनिष्ठेच्या जोरावर आपल्या लष्करी कमतरतेवर मात करत दैदिप्यमान विजयाला गवसणी घातली. २३ सप्टेंबर १९६५ हा तो विजयाचा दिवस होता. त्याला या वर्षी ५० वर्षे झाली.

१९६५ मधील विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त नगरच्या "एसीसीएस'मध्ये गुरुवारी युद्धस्मारकासमोर शहीदांना मानवंदना देताना एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित. समवेत डावीकडून मेजर उदय भान, निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल आनंद गोरे, मेजर जनरल बी. एस. मलिक, लेफ्टनंट जनरल व्ही. के. सेवल.