श्रीरामपूर- अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून संतोष देवराव रंधवे यास येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एन. के. चव्हाण यांनी मंगळवारी दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच २८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपी रंधवे हा शहरातील बोंबले वस्तीवर राहतो. त्याच्या शेजारीच अल्पवयीन मुलगी राहते. तिचे आईवडील मोलमजुरी करतात. २५ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी मुलगी आईला संगणकाच्या क्लासला जाते म्हणून घरातून गेली. परंतु ती घरी परतली नाही. तिच्या वडिलांनी मुलीच्या नॉर्दन ब्रँच येथील मैत्रिणीकडे संगणक क्लासवर चौकशी केली. क्लासला नाताळची सुटी असल्याचे तसेच ती मैत्रिणीकडे गेली नसल्याचे समजले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांच्याशेजारील संतोष रंधवे घरी नसल्याचे आढळून आले. त्याच्या मेव्हण्याकडे चौकशी केली असता तो घरी नाही, कुठे गेला माहीत नाही, अशी उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यानेच मुलीला पळवून नेल्याची तिच्या वडिलांची खात्री झाली.
पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी शहर पोलिसांत रंधवे याच्याविरुद्ध मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीने पीडित मुलीवर औरंगाबाद वर्सोवा नाका येथे अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर झाली. यावेळी १६ साक्षीदार तपासले. सरकारी वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी तसेच २८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी २६ हजार रुपये पीडित मुलीच्या कल्याणासाठी देण्याचा आदेश दिला. सरकारतर्फे रोकडे, बी. एल. तांबे यांनी काम पाहिले.