आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

....आणि आचार्य अत्रे यशस्वी नाटककार झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आचार्य अत्रे यांनी आधी दोन नाटके लिहिली होती, पण ती फारशी चालली नाहीत. एकदा आमच्या घरी अत्रे आले असताना त्यांना एका वर्गमित्राच्या विक्षिप्तपणावरून नव्या नाटकाचा विषय सुचला. त्यावर लिहिलेले "साष्टांग नमस्कार' हे नाटक तुफान गाजले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने नाटककार म्हणून त्यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली....

हे सांगत होते सावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंचाचे सल्लागार चंद्रशेखर करवंदे. १३ जून हा आचार्य अत्रे यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या अनेक आठवणींना करवंदे यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, माझे वडील दि. ल. तथा अप्पासाहेब करवंदे आचार्य अत्रे हे वर्गमित्र. त्यामुळे आमच्या पुण्यातील घरी त्यांचे नेहमी येणे-जाणे असे. १९३२ ची ही घटना आहे. मी तेव्हा आठ वर्षांचा होतो. त्यांचे एक वर्गमित्र थोडे विक्षिप्त स्वभावाचे होते. त्यांच्या सौभाग्यवतींकडून हा प्रकार माझे वडील आणि अत्र्यांना समजला. त्या मित्राची खोड मोडण्यासाठी मग अत्र्यांनी नाटक लिहिले. त्याचे नाव "साष्टांग नमस्कार'. हे नाटक तुफान चालले. "तुझ्यामुळे अत्रे नाटककार झाले' असे माझे वडील त्या मित्राला नेहमी म्हणत.
आचार्य अत्रे यांची नाटक लिहिण्याची पद्धत वेगळी होती. "साष्टांग नमस्कार'मध्ये त्यांनी लिखाणाचा फॉर्म बदलला. तो प्रेक्षकांना बेहद्द आवडला. त्यामुळे नंतरची सगळी नाटके त्यांनी या पद्धतीनेच लिहिली. या नाटकांनी पुढे इतिहास घडवला. आचार्य अत्रे १९५२ मध्ये जेव्हा आमच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनीच हे सांगितले, असे करवंदे म्हणाले.
महाराष्ट्रात अनेक दिग्गज साहित्यिक होऊन गेले. तथापि, साहित्यातील प्रत्येक क्षेत्र गाजवणारा आचार्य अत्र्यांसारखा सारस्वत झाला नाही. त्यांच्या साहित्याचा दर्जा अव्वल होता. हाडाचे शिक्षक असलेले अत्रे उत्तम कवी, फर्डे वक्ते, खंदे पत्रकार, प्रतिभावंत नाटककार, धुरंधर राजकारणी, कल्पक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी लिहिलेल्या कवितेला रसिकांची वाहवा मिळवण्याचे भाग्य त्यांना लाभले. नगरमध्येही ते अनेकदा येऊन गेले, असे करवंदे यांनी सांगितले.
आचार्य अत्रे
अत्र्यांची नाटके
'वीर वचन' घेऊन 'गुरुदक्षिणा' देण्यासाठी 'वंदे मातरम' म्हणत 'घराबाहेर' पडलो. 'मी उभा आहे' म्हणून 'पाणिग्रहणा'साठी 'मोरूची मावशी' आली आणि "पराचा कावळा' झाला. "साष्टांग नमस्कार' घालून "प्रीतीसंगमा'वर जाऊन "उद्याचा संसार' पाहता पाहता "अशी बायको हवी' म्हणाले, "पण जग काय म्हणेल' या कल्पनेने "तो मी नव्हेच' म्हणत "मी मंत्री झालो' आणि "डॉ. लागू' सारखा "सम्राटसिंह' होता होता "कवडीचंुबक' झालो आणि "लग्नाच्या बेडीत' अडकलो.
बातम्या आणखी आहेत...