आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: तळपत्या उन्हात वाहतूक पोलिसांची सत्वपरीक्षा, तरीही बजावताहेत कर्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील बहुतेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना उन्हात उभे राहून वाहतूक नियमन करावे लागते. - Divya Marathi
शहरातील बहुतेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना उन्हात उभे राहून वाहतूक नियमन करावे लागते.
नगर - एप्रिलच्या मध्यात पाऱ्याने ४२ अंश सेल्सिअसची पातळी गाठली आहे. उन्हाच्या झळा सहन करत अनेकांना त्यांचे नित्याचे काम पार पाडावेच लागते. चौकांत थांबून वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना सध्या या उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे. भर उन्हात उभे राहून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी किंवा बेशिस्त वाहनचालकांना दंड करून धडा शिकवण्याचे काम वाहतूक पोलिस करत आहेत.
 
नागरिकांमधून नेहमीच वाहतूक पोलिसांवर टीका होते. मात्र, या पोलिसांना नागरिकांच्या सुविधेसाठी उन्हामध्ये उभे राहूनच वाहतुकीचे नियमन करावे लागते. वाहतूक पोलिसांना सकाळी साडेआठच्या सुमारास चौकात काम बजावण्यास उपस्थित राहावे लागते. सध्या सकाळी नऊपासूनच उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवतो. उन्हाच्या त्रासामुळे नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळतात. मात्र, वाहतूक पोलिसांना कर्तव्य बजावताना उन्हाची पर्वा करून चालत नाही.
बहुतांश चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना उभे राहण्यासाठी सावलीची सुविधा नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना भोवळ येण्याचे प्रकार घडत आहेत. वाहतूक शाखेने या पोलिसांना उन्हाळी टोप्या दिल्या आहेत. पण, केवळ टोपी घालून भर उन्हात चौकात थांबल्याने उन्हाच्या झळा कमी होत नाहीत.

वाहतूक पोलिसांसाठी खासगी कंपनी किंवा स्वयंसेवी संस्थेने काही चौकांमध्ये ट्रॅफिक बूथ उभे केले आहेत, पण रणरणत्या उन्हात डोक्यावर सावली असली, तरी चहूबाजूने उन्हाच्या झळा प्रचंड जाणवत आहेत. शिवाय आता अशाप्रकारे ट्रॅफिक बूथ देण्यासाठी कुठली कंपनी किंवा स्वयंसेवी संस्था पुढे येत नाही. त्यामुळे बहुतांश चौकांमध्ये वाहतूक पोलिसांना सावली उपलब्ध होत नाही. चौकांच्या आसपास झाडे नसल्याने वाहतूक पोलिसांना उन्हात उभे राहावे लागते.
 
माळीवाडा बसस्थानक चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करणाऱ्या एका पोलिसाने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले, आम्हाला केवळ उन्हाळी टोप्या देण्यात आल्या आहेत. सतत उन्हात उभे राहिल्याने अनेक वेळा भोवळ आल्यासारखे जाणवते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ट्रॅफिक बूथ असूनही उपयोग नसतो. उन्हामुळे त्वचेचे अन्य विविध प्रकारचे आजारही संभवतात. शहरातील सर्व चौकांमध्ये वाहतूक पोलिसांसाठी ‘ट्रॅफिक बूथ’ उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
काळजीसुद्धा गरजेची
रणरणत्या उन्हात वाहतूक पोलिस आपले कर्तव्य चोख बजावतात, हे निश्चितच कौतुकास पात्र आहेत. वाहतूक पोलिस उन्हात काम करत असल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. शक्यतो सावलीत थांबून वाहतूक नियमन करावे. डोक्यावर टोपी हवी.''
- चिन्मय पंडित, सहायक पोलिस अधीक्षक.
 
तरीही कर्तव्य आहेच
काही ठिकाणी पोलिस आडोशाला उभे राहून वाहतूक नियमनावर लक्ष ठेवतात. काही चौकांमध्ये ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना इमारतीच्या कडेला सावलीखाली थांबता येते. मात्र, पोलिस अधीक्षक चौक, चांदणी चौक, इंपिरियल चौक, प्रेमदान चौक, बायपासला जोडणाऱ्या चौकांमध्ये ड्युटीला असलेल्या पोलिसांना उन्हातच उभे राहावे लागते. यापैकी काही चौकांत पोलिसांचे उन्हापासून संरक्षण होण्याची कोणतीही उपाययोजना नाही, तरीही पोलिस इमाने-इतबारे कर्तव्य बजावत अाहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...