आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेश्या व्यवसायावरील कारवाईस अखेर मुहूर्त, श्रीगोंदे शहरातील हॉटेल सागरवर छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात बिनबोभाट सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई करायला पोलिसांना अखेर मुहूर्त गवसला. या अवैध धंद्याकडे खाकी वर्दीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दैनिक दिव्य मराठीने १२ ऑगस्टच्या विशेष वृत्तात म्हटले होते. या दणक्यानंतर खाकीला जाग आली असून पोलिसांना अवैध व्यवसायावर कारवाई केली. शुक्रवारी दुपारी श्रीगोंदे शहरातील बहुचर्चित हॉटेल सागरवर प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात अाले.
वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेंतर्गत पिटा सेल असतो. पण जिल्ह्यातील सेलने गेल्या तीन-चार वर्षांपासून एकही कारवाई केलेली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्गांवरील बहुतांश ढाब्यांवर राजरोसपणे अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालतो. नगर-पुणे, नगर-मनमाड इतर महामार्गांवरही काही ढाब्यांवर हा व्यवसाय फोफावला आहे. काही हॉटेल्स ढाबे तर याच गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहेत. पोलिस दलाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, ही बाब दैनिक दिव्य मराठीने मांडली. त्यामुळे पोलिस दलाला कारवाई करावी लागली.

काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षणार्थी म्हणून जिल्ह्यात आलेले पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांनी पिटाची कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील निवडक लोकांना त्यांनी सोबत घेतले. श्रीगोंद्यात आंबटशौकिनांमध्ये कुप्रसिद्ध असलेल्या हॉटेल सागरवर या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी डमी गिऱ्हाईक आत पाठवून हॉटेलमध्ये हा व्यवसाय चालत असल्याची खात्री करुन घेतली. ती पटल्यानंतर लगेचच पोलिसांनी छापा टाकून काही महिला गिऱ्हाईकांना ताब्यात घेतले.

हॉटेल सागरवर छापा पडल्याची बातमी पसरताच नागरिकांनी हॉटेलबाहेर मोठी गर्दी केली. पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन युवतींसह काही ग्राहक हॉटेल व्यवस्थापनाचे काही जण असे सुमारे १३ जणांना ताब्यात घेतले. या हॉटेलमध्ये अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरु असल्याचे या छाप्यामुळे समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांना श्रीगोंदे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे कामकाज गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. वेश्या व्यवसायावर कारवाई करणे अखेर पोलिसांना भाग पडले असून हा व्यवसाय चालणारी इतर ठिकाणेही आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

पुन्हा तोच व्यवसाय
सन २००९ मध्ये प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक विवेक मासाळ यांनी याच हॉटेलवर छापा टाकला होता. त्यावेळीही या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची बाब समोर आली होती. पोलिसांनी काही युवतींची सुटका करुन गिऱ्हाईकांवर कारवाई केली. मात्र, काही दिवसांनी या हॉटेलमध्ये पुन्हा व्यवसाय सुरु झाला. आता पुन्हा प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांच्या कारवाईमुळे हे हॉटेल चर्चेत आले आहे.

आजपर्यंत डोळेझाक
जिल्ह्यात वेश्या व्यवसाय सर्रास सुरु असूनही पोलिसांचे छापे पडत नव्हते. पोलिसांना या व्यवसायाची खबर कशी काय मिळत नव्हती, हे आश्चर्यच आहे. ढाब्यांवर मारामाऱ्या, वर्चस्वातून होणाऱ्या चकमकी नित्याची बाब आहे. श्रीगांेद्यातील कारवाईमुळे स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतर ठिकाणी सुरु असलेल्या वेश्या व्यवसायांसाठी स्थानिक पोलिसच जबाबदार आहेत.
बातम्या आणखी आहेत...