आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकुंदनगरकरांंचा मनपा कार्यालयावर मन्नत मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नागरी सुविधा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या मुकुंदनगरमधील नागरिकांनी सोमवारी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढला. वेळोवेळी तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांनी मन्नत मोर्चा काढून अधिकारी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. अाक्रमक झालेल्या आंदोलकांनी यावेळी मुकुंदनगर उपनगर मनपा हद्दीतून वगळून ग्रामपंचायत करण्याची मागणी केली. मोर्चा येण्यापूर्वीच मनपा प्रशासनाने कार्यालयाची प्रवेशद्वारे बंद केली. त्यामुळे विविध कामांसाठी मनपा कार्यालयात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य यापैकी एकही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मुकुंदनगर उपनगरातील नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवर पडलेले खड्डे, अवेळी सुटणारे पाणी, तुंबलेले ड्रेनेज, जागोजागी साचलेला कचरा यासारख्या नागरी समस्यांना नागरिकांना दरराेज तोंड द्यावे लागत आहे.आतापर्यंत विविध संघटनांनी मनपा अधिकारी पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अधिकारी पदाधिकारी मुकुंदनगरमधील प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येथील समस्या दूर होण्याऐवजी आणखी वाढत आहेत.

नगरोत्थान अभियानांतर्गत काही रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले, परंतु दोन-तीन वर्षे उलटूनही या रस्त्यांची कामे मार्गी लागलेली नाहीत. जागोजागी खोदकाम करून काम सुरू असल्याचा देखावा मनपा प्रशासन करत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना मणक्यांचे आजार जडले आहेत. पाणीप्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. पाणी सोडण्याची वेळ निश्चित नसल्याने महिलांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मागील काही दिवसांपासून परिसरात रात्री अवेळी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे महिलांना पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. या सर्व समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी मनपा कार्यालयावर मन्नत मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. आयुक्त विलास ढगे उपस्थित नसल्याने आंदोलकांनी उपायुक्त अजय चारठाणकर भालचंद्र बेहेरे यांना निवेदन दिले. मुकुंदनगरमधील नागरी समस्यांबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊ, असे आश्वासन उपायुक्तांनी दिले.

सामान्यांची गैरसोय
मनपा प्रशासनाने आंदोलकांना प्रवेशद्वाराबाहेरच अडवण्याची भूमिका घेतली आहे. आंदोलन असले, तरी मनपा कार्यालयाची प्रवेशद्वारे बंद करण्यात येतात. मन्नत आंदोलनाच्या वेळीदेखील दोन्ही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलकांनी प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या मांडला. मनपा कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली.

मनपा हद्दीतून वगळा
महापालिका स्थापन होऊन बारा वर्षे उलटली. या कालावधीत मनपाने मुकुंदनगरकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील नागरी समस्यांमध्ये मोठी वाढ झाली. मनपा हद्दीत असूनही जर सुविधा मिळत नसतील, येथे ग्रामपंचायत स्थापन करा, अशी मागणी आंदोलकांनी केली. यापूर्वी देखील विविध संघटनांनी ही मागणी केली आहे. तरी देखील मनपा प्रशासन मुकुंदनगरमधील समस्या सोडवण्यास तयार नाही.


------------------------------------
बातम्या आणखी आहेत...