आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला; जेसीबी, ट्रॅक्टर पळवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- वाळूत स्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर हल्ला करुन वाहने पळवून नेल्याची घटना घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. नायब तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या तक्रारीवरुन घारगाव पोलिस ठाण्यात तिघा वाळूतस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाच शनिवारी नायब तहसीलदारांनादेखील तस्करांनी धक्काबुक्की केली. 


तालुक्यातील पठार भागात समावेश असलेल्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होतो. वाळूउपशासाठी जेसीबी, पोकलंडचा वापर तस्कर करत असतात. प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांना या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नायब तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक कारवाईसाठी पाठविले. पथकात कुलथे यांच्यासमवेत प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक चाँद देशमुख, वाहनचालक सुभाष गुंजाळ, कोतवाल विकास वर्पे यांच्यासह शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांचा समावेश होता. 


पथकाने शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास साकूरनजीक असलेल्या मांडवे शिवारातील बनाई येथे छापा टाकला. त्यावेळी पथकाला जेसीबीने दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळून आले. तस्करांकडून वापरला जाणारा जेसीबी आणि ट्रॅक्टरदेखील विनाक्रमांकाचे होते. यादरम्यान वाळूतस्करी करणारे पसार झाले. पथकाने ट्रॅक्टरमधील वाळूची तपासणी केली असता प्रत्येक ट्रॉलीत दोन ब्रास वाळू आढळून आली. पथकाने लगेचच जेसीबी आणि वाळू वाहणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. पकडलेली वाहने घेऊन पथक घारगाव पोलिस ठाण्याकडे येत असताना राजू श्रीरंग डोंगरे (जांबूत), उल्हास भाऊसाहेब दरेकर आणि सुभाष दामू दाते (दोघे देसवडे, पारनेर) या तिघांनी ही वाहने आणि पथकाला रस्त्यात अडवले. 


पथकातील अधिकाऱ्यांवर हल्ला करत त्यांनी शिविगाळ, धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वाहने सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकारी वाहने सोडत नसल्याचे दिसताच आरोपींनी थेट अधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्या ताब्यातील जेसीबी, आणि दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. गावातील लोकांना बोलावत तुमचा काटा काढू अशी धमकी देत तेथून गायब झाले. 


नायब तहसीलदार कुलथे यांनी यासंदर्भात शनिवारी रात्री घारगाव पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा, शासकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. उपनिरीक्षक अन्सार इनामदार आरोपींचा तपास करत आहेत. 


आंबेकरांची पाठ फिरताच पुन्हा वाळू तस्करी 
वाळू तस्करांविरोधात तत्कालिन प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी नदीपात्रात उतरत कारवाई केली. आंबेकर यांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे वाळूतस्करांत या ‘लेडीसिंघम’ची दहशत निर्माण झाली होती. आंबेकर यांची नेवासे प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर वाळूतस्कर आणि तस्करांशी लागेबांधे असलेल्या महसूलच्या काही अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. आंबेकर यांच्यानंतर संगमनेरमध्ये वाळूतस्करांवरील कारवाई थंडावली आहे. त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण हाेताच वाळूतस्करीदेखील पुन्हा नव्या जोमाने सुरु झाली. 


आरोपींना लवकरच ताब्यात घेणार 
घटनेनंतरलगेचचपोलिसांनी फरार झालेल्या आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. एका आरोपीच्या घरीदेखील जाऊन आलो, मात्र तो सापडला नाही. आरोपी लवकरच ताब्यात घेतले जातील.

- अन्सारइनामदार, पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...