आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेवासे तालुक्यात तीन दूध संकलन केंद्रांवर छापे, बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे- तालुक्यातील साईनाथनगर, झापवाडी खुपटी येथील दूध संकलन केंद्रांवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एकाच वेळेस छापे टाकून बनावट दूध तयार करण्याचे साहित्य जप्त केले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. 
 
गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने नेवासे-श्रीरामपूर महामार्गावरील श्रीभवानी दूध प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या दूध डेअरीवर छापा टाकला. तेथील चार कामगारांची चौकशी करण्यात आली. संशयास्पद पावडर आणि विविध प्रकारची रसायने आढळल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने नगर येथील अन्न सुरक्षा विभागाला कळवल्यानंतर हे विभाग चक्क तीन तासांनी घटनास्थळी पोहोचले. अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. पवार भारत भोसले यांच्या पथकाने डेअरी, तसेच इतर अडगळीच्या खोल्यांमधील बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त केले. प्रत्येक वस्तूचे सॅम्पल घेण्यात आले. डेअरीत उभा असलेला हजार लिटर दूध असलेल्या टँकरमधील दुधाचे नमुने घेण्यात आले. रासायनिक पावडरच्या ११ बॅग, कॉस्टिक सोडा पोटॅश पावडर असे बनावट दूध बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांचे नमुनेही घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. टँकरमधील दूध नष्ट करण्यात आले. 
 
नेवासे शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खुपटी, तसेच घोडेगावजवळील झापवाडी येथील दूध संकलन केंद्रावरही छापा टाकण्यात आला. तिन्ही ठिकाणी बनावट दूध बनवण्याचे रासायनिक साहित्य मिळाले. या सर्व ठिकाणी साहित्य पुरवणारा संशयितही ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने याबाबत नेवासे पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. 
 
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक शरद गोर्डे श्रीधर गुट्टे, तसेच मन्सूर सय्यद, दिनकर नानेकर, भाऊसाहेब काळे, मनोज गोसावी, दत्तात्रेय जपे, रवि कर्डिले, दत्त गव्हाणे, मल्लिकार्जुन बनकर, विजय कुमठेकर, सचिन अडबल, बेरड, भोपळे, मिरपगार, काळे, सुलाने, जाधव यांनी ही कारवाई केली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...