आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलवर कारवाई; हॉटेलवाले मात्र मोकाट, शहरातील बांधकामे नियमबाह्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवण्यापुरती मर्यादित असलेली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कधी नव्हे ती प्रथमच मोठ्या (रुग्णालये) अतिक्रमणधारकांच्या विरोधात सुरू झाली. अर्थात न्यायालयाचे आदेश नसते, तर या कारवाईलादेखील मुहूर्त मिळाला नसता. महापालिकेने आता शहरातील अन्य मोठ्या अतिक्रमणांवरही हातोडा टाकावा, अशी मागणी नगरकर करत आहेत. रुग्णालयांप्रमाणेच शहरात हॉटेल मंगल कार्यालयांची संख्या मोठी असून त्यापैकी शेकडो इमारती नियमबाह्य आहेत. या बेकायदा इमारतींवर हातोडा पडणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान, या बेकायदा हॉटेल मंगल कार्यालयांचा सर्व्हे केल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी मंगळवारी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 
 
मध्यवर्ती शहर उपनगरांमध्ये ९३१ पक्की बेकायदा बांधकामे आहेत. रुग्णालये, लहान-मोठी हॉटेल, मंगल कार्यालये, अपार्टमेंट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, तसेच इतर इमारतींचा त्यात समावेश आहे. रुग्णालये वगळता या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्याचा मुहूर्त महापालिकेला अद्याप मिळालेला नाही. रुग्णालयांवरील कारवाईदेखील गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर रुग्णालयांवरील कारवाई सुरू करण्यात आली. परंतु शहरातील अन्य बेकायदा बांधकामांचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रुग्णालयांप्रमाणेच हॉटेल मंगल कार्यालयांची बेकायदा बांधकामे पाडावीत, अशी मागणी पुढे येत आहे. 
 
शहरात तब्बल २७५ पेक्षा अधिक हॉटेल मंगल कार्यालये असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यात शेकडो हॉटेल मंगल कार्यालयांच्या इमारती नियमबाह्य अाहेत. विशेष म्हणजे बहुसंख्य नगरसेवक हॉटेलमालक आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गावरील परमीट रूम बार बंद करण्यात आले. त्यात शहरातील सुमारे शंभर बारचा समावेश अाहे. अनेक बारच्या इमारती नियमबाह्य उभ्या करण्यात आल्या आहेत. असे असतानाही काही पदाधिकारी या बारना अभय देण्यासाठी शहरातून जाणारे महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा आग्रह धरत आहेत. महापालिकेने आतापर्यंत १५ ते १८ रुग्णालयांच्या बेकायदा बांधकामांवर हातोडा टाकला. परंतु आता हा हातोडा शहरातील अन्य पक्क्या बांधकामांवर पडणार का, हा प्रश्नच आहे. 
नगर शहरातील काही रुग्णालयांची पक्की अतिक्रमणे सध्या हटवण्यात येत आहेत. 
 
फेरीवाल्यांचे नेहमीच मरण 
अतिक्रमणहटाव मोहिमेच्या नावाखाली फेरीवाल्यांना लक्ष्य केले जाते. टपऱ्या हातगाड्या जप्त करण्यात येतात. एका टपरीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालते. एखादा हातगाडीवाला फळे घेऊन सकाळी ते रात्री असे बारा तास फिरल्यानंतर त्याच्या पदरात जेमतेम २५० ते ३०० रुपये पडतात. दिवसभर कष्ट करून कमवलेल्या पैशांतून त्याला महापालिकेच्या रस्ताबाजू कराची दहा रुपयांची पावती दररोज फाडावी लागते. आता प्रथमच मोठ्या अतिक्रमणांवर हातोडा पडल्याने आम्ही समाधानी असल्याचे एका फेरीवाल्याने दैनिक दिव्य मराठीला सांगितले. 
 
आदेशच हवाय का? 
नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक ते नागापूरपर्यंतच्या २०५ बेकायदा बांधकामांकडे महापालिका प्रशासनाने साेयीस्कर दुर्लक्ष केले आहे. या महामार्गावर पश्चिमेस १११, तर पूर्वेस ९४ पक्की बेकायदा बांधकामे असून त्यांना नोटिसादेखील बजावण्यात आल्या आहेत. पुढील कारवाई करण्यास मात्र महापालिकेचा एकही अधिकारी अद्याप पुढे आलेला नाही. न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच शहरातील बेकायदा बांधकामांवर हातोडा पडणार का, असा प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत. 

खंडपीठात उद्या सुनावणी 
आैरंगाबादखंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने आतापर्यंत १५ ते १८ पार्किंगखाऊ रुग्णालयांचे बेकायदा बांधकाम पाडले आहे. दोन दिवस तारकपूर परिसरातील रुग्णालयांवर कारवाई केल्यानंतर मंगळवारी बुरूडगाव रस्ता, दिल्ली दरवाजा आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली. महापालिकेने ही कारवाई थांबवून काही दिवस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डॉक्टर संघटना न्यायालयाकडे करणार आहे. याप्रकरणी १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...