आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील संरक्षित वास्तूंजवळील लोकांचा जीव टांगणीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नव्या नियमावलीमुळे संरक्षित वास्तू परिसरात नवीन बांधकामाला मनाई आहे. शिवाय या नियमामुळे या वास्तूंशेजारच्या जुन्या इमारतींची डागडुजी करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे तेथे राहणार्‍या शेकडो नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

पुरातत्व विभागाने 2010 मधील विधेयकानुसार पुरातन वास्तूंच्या परिसरात 100 मीटर अंतरात नव्या इमारती बांधण्यास, तसेच खोदकाम करण्यास बंदी घातली आहे. त्यापुढील 200 मीटर भागात पूर्व परवानगीनेच बांधकाम करता येते.

नगर शहरात पाच संरक्षित वास्तू आहेत. त्यात दो बोटी चिरा, न्यामतखानी दरवाजा, मक्का मशीद, बारा इमाम कोठला, बागरोजा यांचा समावेश आहे. या वास्तूंच्या परिसरातील काही जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींची दुरुस्ती अथवा त्याठिकाणी नवीन इमारती बांधण्याचा संबंधितांचा विचार आहे. परंतु महापालिकेने त्यांना बांधकामाची परवानगी नाकारून पुरातत्व खात्याकडे बोट दाखवले आहे. पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय या परिसरात दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करता येणार नाही. महापालिकेचे बेग पटांगणातील नियोजित टपरी मार्केटही याच कारणामुळे अडचणीत आले आहे. काही नागरिकांनी परवानगीसाठी औरंगाबाद येथील पुरातत्व कार्यालयाचे उंबरठे झिजवले. तथापि, कडक नियमावलीमुळे परवानगी मिळवण्यात अडचणी येत आहे. डागडुजीअभावी इमारत कोसळल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.